बेकायदा वाळू उपसा सुरूच..!

हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ - मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पळसपूर, कोठा हद्दीत बेकायदा वाळू उपसा पुन्हा सुरु झाला आहे. चार दिवसापूर्वी बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे वृत्त "नांदेड न्युज लाईव्ह " मध्ये प्रसिद्ध होताच या परिसरातील तलाठ्याने एका वाळू माफियाचे वाहन पकडून जुजबी कारवाई केली. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणाहून वाळू उपसा सुरु झाला आहे.

हिमायतनगर येथील तत्कालीन तहसीलदार स्थानिकला राहत नसल्याचा फायदा घेत सिरंजणी सज्जाचे व पळसपूर सज्जाचे तलाठ्यांनी स्वार्थासाठी वाळू माफियांना अभय देऊन शासनाला गंडविण्याचा प्रकार सुरु केला होता. त्यामुळे वाळू माफियांकडून राजरोसपणे वाळूचा उपास केला जात होता. याबाबत नांदेड न्युज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच तलाठी सुगावे यांनी पळसपूर हद्दीतील रेती घाटावर विदर्भातील वाळू माफियांची चार वाहने पकडली होती. मात्र त्यांच्यावर किंतीही कार्यवाही न करता चार आकडी रक्कम घेऊन सोडून दिले. त्यानंतर तीन दिवसांनी सिरंजणी सज्जाचे तलाठी शे.मोइन यांनी कोठा नदी काठावरून वाळू चोरून नेताना एका वाहनास रंगेहात पकडले. या बाबतची माहिती मंडळ अधिकारी श्री सय्यद यांना मिळताच त्यांनी तलाठ्यास सदर वाहन धारकास शासकीय नियमानुसार बाजार भावाच्या तिप्पट म्हणजे १२ हजार दंड आकारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या तलाठी महाशयाने त्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत वाळू माफियास अभय देत जुजबी कार्यवाही करून किरकोळ स्वरूपाची दंडाची रक्कम भरून घेतल्यामुळे पुन्हा या ठिकाणाहून वाळू उपसा सुरु झाला आहे. या वाळू उपशामुळे विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरील नदीकाठावरील गावाच्या शेत जमिनींची दरड तुटून जाण्याचा धोकानिर्माण झाला आहे. वाळू उपसण्याची कायदेशीर बोली घारापुर रेती घाटाची झाली असली तरी नदी काठावरील पळसपूर, कोठा, धानोरा, रेणापुर, मसोबा नाला सरसम, कामारी, वारंगटाकळी, डोल्हारी, दिघी, गावच्या हद्दीतही वाळू उपसा सुरु आहे. हा सर्व प्रकार राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदार माफियाकडून स्थानिक अधिका-यांना हाताशी धरून सुरु ठेवल्यामुळे वरिष्ठ अधिका-यांच्या कारवाईला ठेंगा दाखवला जात आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी वाळूची साठेबाजी करून दुप्पट किमतीने विकण्याच्या उद्देशातून वाळू माफिया अवैध्य रित्या साठा करुन ठेवण्याच्या तयारीत आहेत. गौन खनीज उपसण्याच्या शासकीय नियमांना बगल देत अवैध्य रित्या राजरोसपने काढलेल्या वाळुचा साठा शेतातील आडराणात व काही गावालगत करुन ठेवल्याचे चित्र धानेारा, हिमायतनगर, पळसपुर, वारंगटाकळी, एकंबा, घारापुर, विरसणी परीसरात दिसुन येत आहे. पाऊस पडताच गरजुंना 2000 ते 1800 रुपये ब्रासने वाळूची विक्री करुन शासनाला गंडवीण्याचा प्रयत्न माफीयांव्दारे चालविला जात आहे.

कालच हिमायतनगर येथील तहसीलदार पदी आबासाहेब चौरे रुजू झाले असून, अवैद्य रित्या उपसा करून साठेबाजी करणाऱ्या वाळू दादांवर कार्यवाही करून त्यांच्या मुसक्या आवळीत शासनाच्या तिजोरीत भर पडतील कि..? तत्कालीन तहसीलदारासारखेच माफियांना अभय देऊन खिसा भरतील..? याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत तलाठी सुगावे यांच्या कडून माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी मी सुट्टीवर आहे असे सांगून फोन बंद केला. तर तलाठी शे.मोइन यांच्याशी संपर्क साधला असता, मी चालान भरणार आहे. त्यानंतर किती दंड आकारला हे सांगेन असे म्हणून फोन कट केला. मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि सोमवारी आल्यानंतर पळसपूर व कोठा भागात स्वतः जाऊन वाळू माफियावर कार्यवाही करून संबंधित तलाठ्यांच्या कारभाराचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी