पाणी टंचाईच्या झळा

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हिमायतनगर 
वासियांना पाणी टंचाईच्या झळा



हिमायतनगर(अनिल मादसवार)उन्हाळ्यापासून सुरुवात झालेल्या पाणी टंचाईने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उग्र रूपधारण केले असून, शहर वासियांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी जी.प.विभागाच्या दोन टैन्करद्वारे शहरातील टंचाई ग्रस्त भागात पाणी पुरवठा केला जात आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या हिमायतनगरची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २४ हजार ७४५ च्या जवळपास आहे. सध्या हि लोकसंख्या ३० हजाराहूर जास्त झाली असून, गावाला पैनगंगा नदीवरील १९४५ मधील जुन्या नळ योजनेद्वारे प्रभाग ०१ व ०२ मधील जवळपास ५० घरांना पाणी पुरवठा केला जातो. तर अर्ध्याहून अधिक गावासाठी ग्रामपंचायती हद्दीत ५२ बोअर घेण्यात आलेले आहेत. ३० बोअर ५५० फुट खालील असून, त्यातील ४५ हून अधिक बोअर बंद तर ९ पेक्षा अधिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. उर्वरित कुपनलिकांची पाणी पातळी घटली असून, शहरात ५ हातपंप असून, ते सुद्धा नादुरुस्त व पाणी नसल्याने सध्या तरी बंद आहेत. त्यामुळे शहरातील अर्ध्या अधिक गावातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

आठ ठिकाणच्या विहिरीत दोन टैन्करद्वारे पाणी पुरवठा

शहरातील लाकडोबा चौक, नेहरू नगर, कोरडे गल्ली, परमेश्वर गल्ली कन्या शाळा, शब्बीर कॉलनी - खुबा मस्जिद, मुर्तुजा नगर कॉलनी, बळीरामसिंह कॉलनी, यासह शहरातील अन्य प्रभागातील नागरिकांना घाघरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जी.प.पाणी पुरवठा विभागाकडे ६ टैन्करची मागणी करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दि. १४ जून पासून दोन टैन्कर दिले. त्याद्वारे शहरातील विहिरीत पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. मात्र शहातील अजूनही काजी मोहल्ला, जनता कॉलनी, बजरंग चौक, कालीन्का गल्ली तसेच नव्याने झालेल्या प्रभागातील  काही भागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत असल्याचे चित्र आहे.


नळयोजना राबूनही पाणी टंचाईच्या झळा... 

मागील अनेक वर्षापूर्वी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. यावर मात करण्यासाठी मागील चार वर्षा खाली तालुक्यातील १४ टंचाई ग्रस्त गावात लोक सहभागातील पाणी पुरवठा नळयोजना राबविण्यात आल्या. मात्र  त्या योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळे कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर योजना असताना  नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

हिमायतनगरची २.५ कोटीची योजना थंड बस्त्यात 

हिमायानगर शहराची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी येथे दोन कोटी १८ लाख ६६ हजार रुपयाची नळयोजना मंजूर झाली होती. मात्र तत्कालीन पाणी पुरवठा समिती व सचिवाने केलेल्या ७ आणि ४ अश्या ११ लाखाच्या अपहारामुळे सदर योजनेचे काम थंड बस्त्यात पडले आहे. आहे निवडणुका आल्या कि शहराची मुख्य पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन नेत्यांकडून दिले जाते. मात्र पुन्हा या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष  केले जात असल्याने अजूनही सदर योजना थंड बस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. 

याबाबत ग्राम विकास अधिकारी श्री शंकर गर्दसवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि शहरातील आठ ठिकाणच्या विहिरीत २ टैन्कर द्वारे दिवसभरातून प्रत्येकी ४ ते पाच फेर्या करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याचे काम चालू आहे. आणखी काही भागात पाणी टंचाई जाणवत असल्याने मागणी नुसार त्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच शहरातील पाणी पुरवठा योजना दिवसेंदिवस महागाईमुळे रखडली आहे. नवीन किमतीनुसार रीवाइज करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, मंजूर होतच नळयोजनेचे काम सुरु होईल असे सांगितले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी