अमावश्या तारणार का..?

अडचणीतील डी.बीं.ना अमावश्या तारणार का..?

नांदेड(प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या देशातील ठिकठिकाणच्या सभा गाजत असताना नांदेड येथे रविवारी होणार्‍या मोदींच्या सभेसाठी स्थानिक पातळीवर कुठल्याच प्रकारचे नियोजन नसल्यामुळे या सभेच्या यशस्वीतेबाबत भाजपाप्रेमींत संभ्रम निर्माण होत आहे. भर अमावश्येत होणारी ही महत्त्वपूर्ण सभा सर्वच आघाड्यावर अडचणीत आलेल्या भाजप उमेदवारासाठी राजकीयदृष्ट्या तारक ठरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डी.बी.पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही स्थानिक पातळीवर पक्षाचा ‘प्रचार आणि प्रसार’ गतिमान केला नाही. देशभरात मोदी लाटेचा उदोउदा होत असताना जिल्ह्यात मात्र मोदींचा नामोल्लेखही दिसून येत नाही. भाजप प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पक्षप्रवक्ते माधव भंडारी तसेच प्रभारी आ. विजय गव्हाणे शहरात तळ ठोकून असले तरी त्यांच्याही नियोजनाचे तीनतेरा झाल्याचे दिसते. उद्या रविवारी नरेंद्र मोदी नांदेडात दाखल होत असून त्यांची जाहीर सभा गुरुगोविंदसिंग स्टेडियमवर होत आहे. ही सभा यशस्वी झाली तरच जिल्ह्यातील भाजपा उमेदवाराचे भवितव्य ठरणार असताना या सभेच्या यशस्वीतेसाठी मात्र भाजपातच अलबेल वातावरण आहे. प्रचाराचा कारभार कोणाकडे? नियोजन कोणाकडे? यासह वाहनांची व्यवस्था, गर्दी जमविण्याची जबाबदारी याबाबत कुठलेच नियोजन दिसत नाही. महायुतीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी असल्याने शिवसेना, रिपाइं (आठवले) गटाचे कार्यकर्तेही प्रचारासाठी फिरताना दिसत नाहीत.
शहरासह ग्रामीण भागातही अद्याप मोदींच्या सभेची माहिती पोहोचली नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागले नसल्याने मोदींच्या सभेला ग्रामीण भागातून गर्दी खेचण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात निर्माण झालेली भाजपची हवा जिल्ह्यात कायम राहील असे वाटत असताना भाजपच्या नियोजन -शून्यतेमुळे व एकाचा पायपोस एकाला राहिला नसल्यामुळे भाजपचा प्रचार कोणत्या मार्गाने सुरु आहे, याचा थांगपत्ता राहिला नाही. मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेते एक-एक जागा महत्त्वाची मानत असले तरी नांदेडमध्ये रविवारी होणारी सभा यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.रविवारी भर अमावश्येत मोदींच्या सभेचा मुहूर्त असल्यामुळे हा मुहूर्त भाजप उमेदवारासाठी राजकीय दृष्ट्या तारक ठरतो की मारक याबाबत उत्स्कुता लागली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी