नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती करावी

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबरच नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती करावी - पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील

नांदेड(अनिल मादसवार)शाळा-महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबरच नवीन ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाची निर्मि‍ती करावी असे प्रतिपादन पंजाब राज्याचे राज्यपाल श्री. शिवराज पाटील चाकुरकर यांनी केले.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सोळाव्या दिक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. के. शंकरनारायणन होते. जिल्ह्याचे पालकमत्री डी. पी. सावंत, कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, कुलसचिव बी. बी. पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. के. भोसले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या समारंभात पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठाच्यावतीने राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. याबद्दल विद्यापीठाचे आभार मानून श्री. पाटील पुढे म्हणाले की, शाळा-महाविद्यालयातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करुन विद्यार्थ्यांनी नवे तंत्रज्ञानाचे प्रयोग केले पाहिजेत. जीवनानूभवातून शक्य असलेली ज्ञान निर्मिती व प्रयोग करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा संशोधनाच्या पैलूंकडे त्यांना वळविण्याची अवश्यकता आहे. अशा पद्धतीने परदेशात खुप लक्ष दिले जाते. आपल्या देशात ते माफक प्रमाणात केले जाते. विद्यापीठांनी शिक्षण, विस्तार, संशोधन आणि विकास यावर लक्ष केंद्रीत करुन कार्य केले तर विद्यार्थ्यांमध्ये दर्जा व गुणवत्तावाढ होईल असे सांगून आपल्या देशातील शिक्षण पद्धतीविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

संशोधन व विकास क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलतांना पाटील म्हणाले की, आपल्या देशात 656 पेक्षा अधिक विद्यापीठे आणि 400 हून अधिक राष्ट्रीय प्रयोगशाळा आहेत. विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी आणि प्राध्यापक प्रबंध लिहितात आणि संशोधन व विकासाला योगदान देतात. राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक संशोधन व विकास साधतात. परंतू ते विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. ही उणीव भरुन काढण्यासाठी प्राध्यापकांना राष्ट्रीय प्रयोग शाळांमध्ये आणि संशोधन व विकास संस्थांमध्ये काम करण्याची परवानगी दिली पाहिजे आणि राष्ट्रीय प्रयोग शाळांमधील संशोधकांना विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकविण्याची परवानगी दिली गेली पाहिजे यामुळे शिक्षण तसेच संशोधन व विकास स्तरावर गुणात्मक दर्जावाढ होईल असेही ते म्हणाले.

नव्या विद्यापीठाच्या अडचणी विषयी त्यांनी आपल्या भाषणात उहापोह केला आणि आधुनिक काळात समस्या सोडविण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब करण्याची गरज प्रतिपादन केली. शंकरराव चव्हाण यांच्या प्रेम व जिव्हाळ्याची आठवण काढत श्री. पाटील यांनी त्यांच्या स्मृतीला आभिवादन करुन मानवता, आपले राज्य राष्ट्र आणि जगाच्या हितासाठी या विद्यापीठातील तसेच राज्यातील आणि देशातील तरुणांनी श्री. चव्हाण यांच्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले.

प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. विद्यापीठातील विविध विद्या शाखांच्या स्नातकांना पीएचडी व पदव्या प्रदान करण्यात आल्या. विविध शाखातील सुवर्णपदके व पारितोषिके राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना देवून सन्मानित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा ही दिल्या.

कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या उपलब्धी व वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा आढावा सादर केला. अध्यापन, संशोधन आणि विस्तार या क्षेत्राला विद्यापीठाने अत्यंत महत्व दिले असून मागील पाच वर्षामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून भरीव मदत व प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगून त्यांनी विद्यापिठाच्या भविष्यातील उपक्रमांची माहिती सांगितले.

या समारंभास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यवस्थापन परिषद, विद्यापरीषद, सिनेटचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिंनी, आदी उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी