'जय नावाचा पराजय' ही अस्वस्थ करणारी कादंबरी - बाबाराव मुसळे -NNL


नांदेड|
महाभारतासारख्या पौराणिक ग्रंथावर एखादी कादंबरी लिहिणे तसे सोपे नाही. परंतु ते धाडस विजय गं. वाकडे यांनी आपल्या प्रतिभेने व शब्दसामर्थ्याने केले आहे. ही कादंबरी मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी केले.     

नांदेड येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवीदास फुलारी, बा. ल. चोथवे व रेणू दहे हे उपस्थित होते. नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.     

पुढे बोलताना मुसळे म्हणाले की, पौराणिक लिखाणात जाण्याची माझी इच्छा नाही आणि ते तितके सोपेही नाही. आनंद यादव यांनी ते लिहिण्याचे स्वातंत्र्य घेतले आणि त्याच्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागले. अशा लिखाणात वाकडे यांनी २३ वर्षे घातली. एवढ्या वर्षात तर त्यांचे वर्तमान परिस्थितीवर लिहिलेली २३ नवीन पुस्तके झाली असती असेही त्यांनी म्हटले. एखादा विषय मनावर घेतला तर त्यात एवढे मुरले पाहिजे की आपल्या रोमारोमातून शब्द बाहेर पडण्याची स्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि ते शब्द लेखणीतून आले पाहिजेत.

देवीदास फुलारी आपले विचार मांडताना म्हणाले की, महाभारतावर माझीही 'पाच आऱ्याचं चाक' ही कादंबरी आहे. पूर्वीच्या ग्रंथकारांना  वेगवेगळ्या काळात महाभारतातील मूळ श्र्लोकात काहीतरी कमतरता वाटत गेली व वरचेवर श्र्लोकाच्या स्वरूपात भर टाकली. मलाही तसेच काहीसे वाटले म्हणून मी माझी कादंबरी लिहिली. ही कादंबरी यशाची वाट आपल्या पायाने चालेल असेही त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले विजय वाकडे यांच्या 'जय नावाचा पराजय' या कादंबरीतील एकेक प्रकरण म्हणजे एकेका कादंबरीचा विषय आहे. त्यासाठी त्यांनी पुढे लिखाण करावे.     

बा. ल. चोथवे यांनी म्हटले की, विजय वाकडे यांनी महाभारताच्या संदर्भाने आपल्याला वाटणारे भाव 'जय नावाचा पराजय' या कादंबरीत मांडले आहेत. परंतु ते व्यापक स्वरूपात यायला हवेत. रेणू दहे यांनी म्हटले की, महाभारताकडे पाहताना प्रत्येकाचे व्यक्तीमत्व कॅलिडोस्कोपप्रमाणे दिसू लागते. वेगवेगळ्या छटा आहेत. वाकडेकाकांनी आपल्या कादंबरीतून तत्कालीन स्त्रीजन्माची कहाणी उभी केली आहे. केली आहे.     

प्रारंभी लेखक विजय गं. वाकडे यांनी या कादंबरी लिखाणामागची भूमिका मांडली. महाभारताचे जसे आकलन झाले तसा लिहिण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. माधुरी रत्नपारखी यांनी केले तर आभार प्रा. राजाराम बनसकर यांनी मानले. कार्यक्रमास निर्मलकुमार सूर्यवंशी, शंकर वाडेवाले, प्रा. महेश मोरे, आनंद पुपलवाड, मिलिंद ढवळे, पंडित पाटील, बा. शं. निळकंठे, सदा वडजे, शिवाजी अंबुलगेकर, दिगंबर जाधव, डी. एन. मोरे खैरकेकर, मोतीराम राठोड, लक्ष्मी पुरणशेट्टीवार, सौ. बालिका बरगळ, उषा ठाकूर, प्रा. रंगनाथ नवघडे, अशोक कुबडे, शिवाजी जोगदंड, गणपत माखणे, शंतनु वाकडे, द. आ. गुडूप आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी