वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर आल्याचे आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी 1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत  अवकाशात 10 बलून फ्लाईटस  सोडण्यात येत आहेत. या बलूनमध्ये वैज्ञानिक उपकरणे असून ठराविक कालावधीनंतर वैज्ञानिक उपकरणे  मोठ्या रंगीत पॅराशुटसह औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा,अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपुर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्याच्या स्थलसिमा हद्दित जमिनीवर खाली येण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना ही उपकरणे दृष्टीस पडतील त्यांनी या उपकरणांना स्पर्श करू नये ‍किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. अशी उपकरणे आढळून आल्यास नजिकच्या पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन  किंवा  जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बलून फॅसिलिटीमधून फुगे सोडले जात आहेत.  हे फुगे पातळ (पॉलीथिलीन) प्लास्टिक फिल्म्सपासून बनवलेले असून 50 मीटर ते 85 मीटर व्यासाचे असतात. ते हायड्रोजन वायुने भरलेले असतात. संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे वाहून नेणारे फुगे, हाती घेतलेल्या प्रयोगानुसार 30 किमी ते 42 किमी दरम्यान उंची गाठतील अशी अपेक्षा आहे.  

काही तासांच्या कालावधीनंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात. सुमारे 20 ते 40 मीटर लांबीच्या एका लांब दोरीवर त्याच्या खाली लटकलेली उपकरणे असलेले पॅराशूट साधारणपणे हळूहळू जमिनीवर येतात.  ही उपकरणे हैद्राबादपासून सुमारे 200 ते 350 किमी अंतरावर असलेल्या बिंदुवर उतरू शकतात. विशाखापट्टणम-हैदराबाद-सोलापूर मार्गावर आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये हे बलून वाहतील. 

वैज्ञानिक संशोधनासाठी ठेवण्यात आलेली उपकरणे अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होईल. त्यातील काही उपकरणांवर उच्च व्होल्टेज असू शकतात ती उघडण्याचा अथवा हाताळण्याचा प्रयत्न केल्यास धोकादायक ठरू शकतात. ही उपकरणे जमिनीवर खाली आल्याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ उपकरणे गोळा करतील आणि शोधकर्त्याला योग्य बक्षीस देतील. 

यासोबत टेलिग्राम पाठवणे, दूरध्वनी करणे, माहिती पोहोचवण्यासाठी प्रवास करणे इत्यादी सर्व वाजवी खर्च देतील. मात्र उपकरणासोबत कोणतीही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही. नांदेड जिल्हा स्थलसिमा हद्दित ही उपकरणे ज्यांना आढळून येतील त्यांनी त्वरीत जवळचे पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधुन माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी