औरंगाबाद| उत्तर भारतातील हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली असून, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले आहे. महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या (१०.६) तुलनेत औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगावात तर पारा जास्तच खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात ओझर येथे रविवारी सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानतज्ज्ञांच्या मते पुढील १०-१२ दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
राज्यात यंदा पंधरा दिवस थंडीचे अगोदर आगमन झाले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली होती. मात्र जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील किमान तापमान घसरले आहे.
थंडी चांगलीच वाढणार
रविवार ते मंगळवार, २२ नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रात तीन दिवस कडाक्याची थंडी जाणवेल.त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून तिसऱ्या आवर्तनाला सुरुवात होऊन थंडी आणखी वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे तामिळनाडू, आंध्र, केरळमध्ये पावसाचा अंदाज आहे. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या वातावरणामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. आता यावेळेस शेतकर्यांच्या रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांकडून भरपूर अपेक्षा आहेत. आता थंडीचा जोर वाढल्यामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमूळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा वाढली आहे.
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी थंडीचा कडक वाढला आहे. परिणामी पिके बहरण्यास सुरुवात झाली आहे. थंडी मुळे रब्बी पिकास पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती थंडी पाहता शेतकरी सुखावला आहे. गहू, ज्वारी, हरभरा, सूर्यफूल पिके आता बहरत येण्याची अशा शेतकऱ्यांना लागली आहे. या वाढत्या थंडीने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.