नांदेड| भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 9 डिसेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर प्रक्रीयेतील पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा सोमवार 28 नोव्हेंबर ते बुधवार 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर होणार आहे.
परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक 14 नोव्हेंबर पासून विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे औरंगाबादचे भूमि अभिलेख उपसंचालक अनिल माने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 9 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. सदर अर्जदाराना विभागाकडून 28 फेब्रुवारी ते 13 मार्च 2022 या कालावधीत छाननी करुन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. छाननी अर्ज प्रक्रीयेत उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत.
अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रीयेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (संगणक आधारित चाचणी)28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशाबाबत विभागाच्या संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे असेही उपसंचालक भुमि अभिलेख औरंगाबाद प्रदेश औरंगाबाद कार्यालय यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.