निवृत्तीवेतन धारकांना पेन्शन मिळण्यासाठी बँकेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक -NNL


नांदेड| निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्या नावासमोरच्या रकान्यात करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून बँकांना अद्याक्षर निहाय यादी पाठविण्यात आली असून ही स्वाक्षरी दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत करावी, असे आवाहन कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे. 

याचबरोबर बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखल करण्याकरिता http://jeevanpramam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सादर  करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील यादीत जर कोणी स्वाक्षरी  किंवा अंगठा उमटवलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर 2022 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 आयकर मर्यादेपेक्षा जास्त निवृत्ती वेतन असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांनी माहिती सादर करावी 

नांदेड येथील कोषागारामार्फत सेवानिवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी  ज्यांचे सन 2022-23 एकत्रित निवृत्ती वेतन 5 लाख 50 हजार व त्यापेक्षा जास्त आहे त्यांनी आपला आयकर सुट मिळण्यासाठी पात्र बचतीचा तपशील रविवार 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्जासोबत पुराव्यासह कोषागारात सादर करावा, अन्यथा नियमाप्रामणे आयकर कपात करण्यात येईल. 

आयकर वसुलीचे नवीन नियम सेक्शन- 115 बीएसी नुसार  नवीन कर व्यवस्था (New Tax Regime  ) व जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime) असे दोन पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. यापैकी आपणास जो पर्याय आयकर कपातीसाठी निवडावयाचा आहे. त्याची माहिती  20 नोव्हेंबर  2022 पूर्वी कळविण्यात यावी अन्यथा जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime)  हा विकल्प आपण स्विकारल्याचे गृहीत धरुन नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल. कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी आयकरासाठी कोणतीही बचतीची माहिती सादर करु नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी