सरसम बु.येथील ग्रामपंचायत कार्यालयालयाने फसवणूक केल्याचा निवेदनकर्त्यांचा आरोप
हिमायतनगर/नांदेड। सरसम बु. येथील ग्राम पंचायत कार्यालयाला पंचायत समिती स्तरावरून अतिक्रमण काढण्याचे आदेश असतांनाही ग्रामविकास अधिकारी हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. तसेच ग्रामपंचायत ला तक्रार अर्ज देण्यासाठी गेलो असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करूण सेवा पुरविणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी अमोल अशोक कांबळे यांनी केली असून आठ दिवसांत सदरचे अनाधिकृत अतिक्रमण नाही काढल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अमोल कांबळे यांनी म्हटले आहे की, माझ्या शेजारील व्यक्तीने रस्त्यावर टिन पत्रे टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मला जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होत आहे. म्हणून मी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज देऊन सदरचे अनाधिकृत अतिक्रमण हटवावे अश्या स्वरूपाचा अर्ज घेऊन गेलो तर ग्रामविकास अधिकारी श्री भोगे यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे. म्हणून मी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालया समोर दि.१४ ऑगस्ट रोजी कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले होते. माझ्या उपोषणाची गंभीर दखल घेत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन अतिक्रमणा बाबत सक्त आदेश दिले होते. मी आमदार महोदयांचा मान राखून मागणी पुर्ण झाली म्हणून व तसेच ग्रामविकास अधिकारी श्री भोगे व सरपंच महोदया यांनी अतिक्रमण काढले असे सांगीतल्यानंतर माझे आमरण उपोषण सोडले होते.
परंतू माझी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात अतिक्रमण तसेच आहे. सदर बाबीसाठी मी ग्रामविकास अधिकारी भोगे यांना तोंडी व लेखी तक्रार अर्ज देत असतांना ते स्वीकारण्यास तयार नाहीत. मला आता ग्रामपंचायत कडून मोठा मानसिक त्रास होत आहे. कागदोपत्री व तसेच नियमानुसार रस्ता असतानाही अतिक्रमण काढले जात नसल्याने मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या निर्णयापर्यंत आलो आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी अमोल कांबळे यांनी केली असून आठ दिवसांत अतिक्रमण नाही निघाल्यास कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा अमोल कांबळे यांनी दिला आहे.