थोर समाज सुधारक महात्मा गांधी -NNL


मी महात्मा म्हणलो गेलो असलं तरी माझे वचन प्रमाण आहे असे समजून कोणीही चालू नये हे आपल्याला  माहित नाही म्हणून चांगला मार्ग हा की महात्म्याचे  वचन देखील बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहावे बुद्धीच्या कसोटीवर ते न उतरल्यास त्याचा त्याग करावा असं  म्हणणारे थोर ,अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजेच महात्मा गांधी आज 2 ऑक्टोंबर त्यांच्या जयंतीनिमित्त या थोर महापुरुषाला विनम्र अभिवाद!                    

महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी आम्हालाच नव्हे तर अनेक लोकांना प्रचंड आकर्षण होते आणि आजही आहे .भारतासारख्या प्रामुख्याने इंग्रजी गुलामी जीवन जगत असलेल्या जनतेच्या हाती अहिंसा हेच योग्य हत्यार ठरेल ही कल्पना सुचवणे आणि ती प्रत्यक्षात रुजवणे यामध्येच महात्मा गांधीचे मोठेपण दिसून येते  त्याशिवाय कुठलेही दुसरे हत्यार येथील जनतेचाच काय तर संपूर्ण देशाचा विध्वंस करू शकले असते .तेव्हा अहिंसा, सत्याग्रह या मार्गाचा अवलंब करून महात्मा गांधींनी भारतीय व जगातील जनतेला घडवले म्हणूनच महात्मा गांधीजी केवळ भारतीय स्वतंत्र्याचे शिल्पकार नसून सत्याग्रहाद्वारे आंदोलन करणारे जागतिक नेतृत्व आहे. ज्याची इतिहासाने सुवर्ण अक्षरात  नोंद घेतलेली दिसून येते.  

"  वैष्णव जन तो  कहिए  पिर पराई जाने रे   "                                  

जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे महात्मा गांधीजी युगपुरुष होते .अत्यंत साधी राहणी आणि  उच्च विचारसरणी व कर्तृत्व यांच्या जोरावर संपूर्ण जगाला भारावून टाकणारे मानवतेचे पुजारी, श्रेष्ठ तत्वचिंतक, शिक्षण तज्ञ आणि अध्यात्मवादी विचारवंत म्हणूनही त्यांना ओळखले जाते.  भारतात सर्वात प्रभावशाली महापुरुषांमध्ये महात्मा गांधीजी यांचा सुद्धा उल्लेख केला जातो. त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. भारत  पारतंत्र्यात रखडला असता भारताला स्वतंत्र करण्याचा सर्वप्रथम विडा महात्मा गांधींनी उचलला होता. मानवतावादी दृष्टिकोन असणारे महात्मा गांधी सत्यावर विश्वास ठेवणारे होते. माणसाने सर्वप्रथम माणूस म्हणून जगावे मानव हीच जात सर्वश्रेष्ठ आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

महात्मा गांधी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अस्पृश्यतेला विरोध केला. महात्मा गांधी यांच्या मते," अस्पृश्यता समाजाला ऱ्हासाकडे घेऊन जाते आणि  अस्पृश्यता हा मानवी समाजातील एक गंभीर दोष आहे आणि हा दोष जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास शक्य नाही असे त्यांचे स्पष्ट होत ." ते अस्पृश्यांना आर्थिक व राजकीय अधिकार देण्याच्या विचारांचे होते .त्याचबरोबर अस्पृश्यांना हिंदू मंदिर, विहिरी ,तलाव यासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जावा जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मसमान व आत्मगौरवाची भावना विकसित होईल आणि त्यांचाही व्यक्तिमत्व विकास साधला जाईल असे त्यांचे मत होते. अस्पृश्यांसाठी" हरिजन" हा शब्द त्यांनी वापरलेला दिसून येतो.

1917 चंपारण्य येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महात्मा गांधींनी आंदोलन केल्याचे दिसून येते. लखनऊ येते 1916 ला भरलेल्या अधिवेशनात बिहार येतील राजकुमार शुक्ला या निळं  पिकवणाऱ्या शेतकऱ्यांने  गांधीजींना आपल्यावर होणाऱ्या अन्याय बाबत सांगितले तेव्हा बिहारमधील चंपान्याजवळील मोतीहारी येते महात्मा गांधींनी सत्याग्रह करून ब्रिटिश मळेवाल्यांच्या जाचातून निळ पिकवणाऱ्या भारतीयांची सुटका केल्याची दिसून येते कारण शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जाचक अटी आणि ब्रिटिश  शेतकऱ्यांना हवे ते पीक घेण्याची सक्ती भारतीय शेतकऱ्यांवर लादली जात होती हे चुकीचे ,अन्यकारी, जाचकनिर्बंध तोडून टाकण्यासाठी 1917 ला महात्मा गांधींनी लढा दिला आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला. त्याच पद्धतीने 1918 मध्ये अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा लढा उभारला ज्यामुळे जे कामगारांचे आर्थिक शोषण होत होते त्या आर्थिक शोषणाला विरोध करण्याचे काम महात्मा गांधींनी केले. ज्या लढ्याचे फलित म्हणजे गिरणी मालकांनी कामगाराच्या पगारात 35 टक्के वाढ केली होती .

1918 च्या खेड  सत्याग्रहात गुजरात मधील खेड जिल्ह्यातील मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकऱ्याच्या पुढाकाराने महात्मा गांधींनी संचारबंदी चळवळ सुरू करून ब्रिटिश सरकारकडून शेतसारा माफ करून घेतला होता.  शेती प्रश्न  म्हणजेच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याची जाणीव महात्मा गांधीला होती आणि आमचा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या जर अशाच राहिल्या तर आमचा देश विकास करू शकत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि म्हणून ब्रिटिशांचे  साम्राज्य आमच्या देशावर असून सुद्धा महात्मा गांधींनी ब्रिटिशांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी प्रवर्त केल्याचे दिसून येते.                      

भारतातील  क्रांतिकार्याला आळा घालण्यासाठी उपाययोजनांची तरतूद असलेला  "रौलट कायदा" जास काळा कायदा 1919 असेही म्हटले जाते.हे  विधेयक ब्रिटिश सरकारने पास केले आणि त्यासाठी नियुक्त असलेल्या समितीचे अध्यक्ष रोलेट यांनी कोणत्याही भारतीय व्यक्तीस विना चौकशी तुरुंगात डामणे ,सरकार विरोधी विचारांचे साहित्य छापने व जवळ ठेवणे हा राजद्रोह ठरवण्यात आला अशा या "ब्लॅक बिल" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉलेट कायद्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला. आणि महात्मा गांधींनी 6 एप्रिल 1919 रोजी रोलेट कायद्याविरुद्ध हरताल पाडण्याचे आव्हान केले म्हणजे चुकीचे कायदे चुकीच्या जाचक अटी जर व्यक्तीवर लादला जात असतील ते तर ते भारतीय जनता सहन करणार नाही हे सुद्धा महात्मा गांधींनी या कार्याच्या माध्यमातून ब्रिटिशांना दाखवून दिले. महात्मा गांधींनी ग्रामीण भागातील लोकांचे भले करण्यासाठी व ग्रामीण लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा करण्यासाठी" हरिजन "नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते.                    

महात्मा गांधींच्या मते स्त्रियांना पुरुषांबरोबर समानतेने वागवले पाहिजे आणि स्त्री व पुरुष हे परस्पर पूरक आहेत .त्यांचे जीवन एकमेकांवर अवलंबून आहे आणि स्त्रियांची उन्नती साधण्यासाठी त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. स्त्रिया सुशिक्षित होत असतील तर त्या लहान बालकावर योग्य संस्कार करू शकतील म्हणून त्यांच्या ठिकाणी सद्गुण निर्माण व्हावे, अशा शिक्षणातून चारित्र्यसंवर्धन व्हावे यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरलेला दिसून येतो .महात्मा गांधीच्या मते स्त्रीने स्वतः सक्षम व्हावे पण जर एखाद्या वेळेस तिच्यावर हल्ला होईल तेव्हा तिने हिंसाहारीचा विचार करत न बसता स्वतःचे रक्षण करणे हे तिचे अध्यय कर्तव्य आहे हे रक्षण करताना माझ्या हातून हिंसा घडेल की अहिंसा याचा विचार न करता तिने स्वतःचा रक्षण करणे गरजेचे आहे स्त्रियांमध्ये प्रचंड हिम्मत, धैर्य प्राप्त होऊन त्या स्वावलंबी आणि स्वतंत्र बनू शकतात असा त्यांचा  दृढविश्वास होता.

महात्मा गांधीच्या मते समाजात समानता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही समानता स्पष्ट करण्यासाठी त्यांनी विश्वस्ताची कल्पना मांडली .त्यांच्या मते श्रमिक- मालक, गरीब -श्रीमंत ,श्रेष्ठ -कनिष्ठ यातील दरी  कमी करावयाची असेल तर प्रत्येक व्यक्तीचे मूल्य समतेच्या कसोटीवर आणायचे असेल तर समाजातील श्रीमंत लोकांनी समाजाकडे पाहताना आपण या समाजाचे विश्वस्त आहोत म्हणून पाहणे बंधनकारक आहे .समाजातील जमीनदार, भांडवलदार, श्रीमंत व्यक्तीने आपल्या गरजांची पूर्तता केल्यानंतर जी जास्तीची संपत्ती आहे तिचा उपयोग समाज हितासाठी, तसेच शेतकरी, श्रमिक व गरिबाच्या विकासासाठी करावा. आर्थिक समता समाजात प्रस्थापित करण्यासाठी विश्वस्त कल्पना अत्यंत उपयुक्त आहे. श्रीमंताने विश्वस्ताची भूमिका स्वीकारली तर अहिंसक  मार्गाने समाजात आर्थिक समता येईल तसेच संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असते.  सर्व संपत्ती ईश्वराच्या मालकीच्या आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आपल्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती बाळगूने असे त्यांचे स्पष्ट मत होते.

थोडक्यात महात्मा गांधी हे समाज सुधारणावादी विचारसरणीचे होते. ते समाजवादाचे महानचिंतक होते. कार्ल मार्क्सचा  समाजवाद ही महात्मा गांधींच्या समाजवादासमोर मध्यम पडतो,  कारण "महात्मा गांधींचा समाजवाद सत्य, अहिंसा ,शांती ,मानवता ,सत्याग्रह, सर्वोदय आणि ग्राम स्वराज्य" यावर आधारित आहे. जो समाजवादी व्यवस्थेला स्थायित्व प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे .जो समाजाला सामाजिक, राजकीय आर्थिक विचाराला व्यावहारिक रूप देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

डाॅ. सत्यभामा जाधव, सद्स्या बाल कल्याण समिती, नांदेड, मो .नंबर:-9403744715

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी