एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
नांदेड, अनिल मादसवार| पत्रकारिता क्षेत्राने मोठी गगनभरारी घेतलेली आहे, असे असताना या चौथ्या स्तंभाने सर्वसामान्य माणसांच्या समस्यांची वाचा फोडण्यासाठी संवेदनशील पत्रकारिता करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. एमजीएम पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेड येथील विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ दि. 21 सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून वर्षा ठाकूर-घुगे बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक तर प्रमुख उपस्थितीमध्ये यशवंत महाविद्यालय नांदेड राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय गव्हाणे, एमजीएम पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर म्हणाल्या की, पत्रकारिता क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन या क्षेत्राने मोठी झेप घेतलेली आहे. या क्षेत्रात नवीन येऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी अभ्यास, लिखाण, वाचन या बाबीकडे अधिक लक्ष द्यायला हवे. चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून पत्रकारांनी उपेक्षित समाजाला न्याय देण्याचे काम पत्रकारितेतून व्हायला हवे. समाजाची संवेदनशीलता जपण्याची जबाबदारी चौथ्या स्तंभावर आहे. सत्य पडताळून पाहून लिखाण करणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाल्या.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. अजय गव्हाणे म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेला आव्हाने उभे टाकलेली आहेत. जनता, शासन, प्रशासन यांच्यामधील महत्वाचा दुवा पत्रकारिता आहे. एखाद्या शस्त्रापेक्षा लेखणी कमी नाही. एक रक्ताचा थेंबही न सांडता क्रांती घडू शकते. लोकशाहीत प्रल्गभता येते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. वर्तमानपत्रे वाचणे आवश्यक आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगून पत्रकारितेसमोर असलेल्या आव्हानाचा पैलू उलगडून दाखविला. तसेच पत्रकारितेत किती सामर्थ्य आहे याचे एक उदाहरण देताना म्हणाले की, एका राज्याच्या अर्थमंत्र्याने अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी पत्रकारांना माहिती दिली. परंतु त्यातील एक पत्रकार बाजूला थांबला होता. त्यावेळी त्या मंत्रीमहोदयांनी त्या पत्रकाराकडे जाऊन उद्या तु सिगारेट कशी ओढतोस अशी उद्गार काढले. त्यावर त्या पत्रकाराने उद्यापासून सिगारेटचे भाव वाढणार अशी बातमी छापली. परिणामी अर्थसंकल्प फुटला यावरून रणकंदान झाले. त्यावेळी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, यावरून पत्रकारितेची ताकद दिसून येते म्हणत अतिशय रंजक पद्धतीने त्यांनी पत्रकारितेचे इतंभुत उदाहरणे दिली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हरपले -रविंद्र तहकीकआज आपण विविध वर्तमानपत्राच्या बातम्या पाहतो. लोकपत्रची भुमिका आणि इतर दैनिकांची भुमिका यात आपल्याला फरक जाणवतो. त्याचे असे आम्ही जे काही लिखाण करतो, ते सडेतोड लिखाण करतो. पण इतर वृत्तपत्रामध्ये पाहिल्यास जे घडते ते मांडले जात नाही. न्यूज चॅनल., वृत्तपत्रे हे एकाच्या अधिपत्याखाली दिसून येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केल्यास अभ्यासक पत्रकार निखील वागळे, रविशकुमार यांनी प्रभावीपणे मत मांडले. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केला. परंतु त्यानंतर त्यांना त्याची किंमत भोगावी लागली. अशा बाबींवरून आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हरपले आहे, असे स्पष्ट म्हणता येईल. किंबहुना आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच शिल्लक नाही असे म्हटले तर वावगे नाही, असे मत दै. लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांनी व्यक्त केले.
तसेच ते म्हणाले की, 1952 आपल्या देशातून चित्ते नामशेष झाले. त्याला विविध भौगोलिक कारणे जबाबदार आहेत. असे असताना भाजपकडून चित्ते नामशेष होण्याच्या कारणामध्ये येथील राजांनी शिकारी करून चित्ते संपविले, यासह विविध बाबींचा अपप्रचार केला. 2009ला सिंगापूर येथे चित्ते आणले होते. परंतु त्यांना वातावरण मानावले नाही. आता भाजप सरकारने विदेशातून चित्ते मागविले. सहाशे एकर जमिनीवरील झुडपे तोडून टाकली, आता या जंगलातील प्राण्यांनी घरटे कुठे बांधावे याचा विचार झाला नाही. अनेक पक्षी बेघर झाले. जिवंत निलगाय इतर प्राणी त्या चित्त्यांना भक्ष म्हणून दिले जातात. ही न शोभणारी बाब आहे. वास्तविक पाहता भारतीय वातावरणाचा अभ्यास करायला हवा असे म्हणत त्यांनी भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये येवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून या क्षेत्रात यायला हवे असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी प्रास्ताविकेत आपल्या विद्यालयाची माहिती सांगितले. पत्रकारिता क्षेत्र हे न्यायाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे मोठ्या जबाबदारीने या क्षेत्रात येणार्या पत्रकारांनी वृत्तलेखण करावे. सर्वसामान्य व्यक्तींना न्याय द्यावा असे त्यांनी सांगितले. आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून दीक्षांत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. गणेश जोशी, प्रा. डॉ. प्रविणकुमार सेलूकर, प्रा. राज गायकवाड, दीशा कांबळे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रा. राज गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला वृत्तपत्र विद्याशाखेचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.