कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास
नांदेड, अनिल मादसवार| महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील भोगरवाडा हे आदिवासी गोंड जमातीचे गाव. "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभिनव पथदर्शी उपक्रमामुळे या गावाच्या आत्मविश्वासाला आज नवी जोड मिळाली. निमित्त ठरले नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे भोगरवाडा गावात शेतकऱ्यांसमवेत संपूर्ण दिवसभर राहणे, त्यांच्या सोबत शेतशिवार फेरी करून पीक पद्धतीला समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरले. गावातील शेतीलापूरक ठरेल अशी पीक पद्धती लक्षात घेणे व शेतकऱ्यांना या बदलापर्यंत विचाराच्या जवळ आणणे हा उद्देश सफल करीत भोगरवाडा गावाने या उपक्रमातून सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून आम्ही विकसित करू असा आत्मविश्वास निर्माण केला.
या गावातील शेतकरी पिढीच्या रिवाजानुसार कापूस व सोयाबीन या पिकावर अधिक भर देत आले आहेत. गावाच्या चोहुबाजुला डोंगर आणि झाडी. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने पाण्याची पातळी ही बऱ्यापैकी या गावात चांगली आहे. निलगाय, हरण, रानडुक्कर यांच्या त्रासापासून व होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी त्यातल्या त्यात गावातील शेतकऱ्यांनी कापसाला जवळ केले. मात्र यातून आर्थिक गणित सावरेलच याची शाश्वती नाही. यापासून प्रवृत्त करून त्यांच्या हाती नवीन पीक पद्धती देणे, त्यांना अधिक उत्पादन घेता यावे यासाठी उच्च तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे आवश्यक होते. शासनाच्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत प्रत्यक्ष कृषि अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना शेतीच्या विकासाचा आज नवा मार्ग गवसला.
ज्योतिराम पांडुरंग तुमराम या आदिवासी शेतकऱ्याच्या घरी चलवदे थांबले. तुमराम यांची चार एकर जमीन या गावात आहे. नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात करायला तयार असून शासनाने ज्या योजना दिल्या आहेत त्याचा अधिक डोळस वापर करू असे त्यांनी सांगितले.
भोगरवाडा गावातील शिवार व येथील जमीन फलोत्पादनासाठी चांगली आहे. येथे सिताफळ, पेरू चांगल्या पद्धतीने पिकू शकतील. ज्यांना फलोत्पादन शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी हळदी सारखे पीक उत्तम पद्धतीने घेण्यासाठी पुढे सरासवले पाहिजे. इथल्या जमिनीचा पोत चांगला असून सेंद्रीय खताच्या माध्यमातून या गावाला सेंद्रीय हळदीचे गाव म्हणून विकसीत करण्यात मोठा वाव असल्याचे रवीशंकर चलवदे यांनी सांगितले.
या भागात निलगाय, हरण, रानडुक्कर सारखे प्राणी शेतीच्या पिकांना हानी पोहोचवतात. हे लक्षात घेता वन विभागाच्या नियमानुसार शेत शिवाराच्या भोवताली मोठा चर करणे याबाबत शक्य-अशक्यता पडताळून पाहिली जाईल, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. येथे उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता सौर ऊर्जा आणि ठिबक सारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जवळ केले तर यात मोठा बदल साध्य करता येईल. याचबरोबर दुग्धव्यवसाय, बकरी पालन, कुक्कुटपालन याला मोठा वाव असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगून शेतकऱ्यांच्या मनात नवा विश्वास निर्माण केला.