वन्य प्राणी या विषयावर राष्ट्रीय ऑनलाइन रांगोळी स्पर्धा संपन्न -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड तालुक्यातील ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी रांगोळी स्पर्धा घेण्यात येते, या वर्षी ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन ही स्पर्धा अतिशय आनंददायी वातावरणात पार पडली.

प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांच्या संकल्पनेतून वरील ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन दि. १७.०९.२०२२ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यातील नांदेड, लातूर, परभणी कोल्हापूर, नवी मुंबई, नाशिक, नॉर्थ गोवा, गुलबर्गा व कलबुर्गी या ठिकाणाहुन एकुण ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. 

रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी बेंगाली टायगर, व्हाईट टायगर, चित्ता, सिंह, लांडगा, हरीण, काळवीट, हत्ती, डायनासोर, मोर, माकड, खारुताई, ससा, घोडा, झेब्रा, गेंडा, पाणघोडा इत्यादी वण्य प्राण्यांच्या विविध रंगांचा वापर करून रांगोळी साकारल्या होत्या. प्रमुख्याने जैवविविधतेत निसर्गातील दृश्य स्वरूपातील सगळ्या घटकांचा समावेश होतो. मानव, पशुपक्षी, वनस्पती इत्यादी. गेल्या काही वर्षांत वन्य जीव आणि मानव यांच्यातील वाढत्या संघर्षाचे, त्यातून वन्यजीवांकडून माणसावर होणारे वाढते हल्ले, त्याविरोधात होणाऱ्या मानवी उपाययोजना वन्य जीवांच्या जीवावर बेतणे याबाबत एक विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. 

या संघर्षाची तीव्रता कमी करायची असेल तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. वन्य जीवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले तरी त्यामागची कारणे नैसर्गिक आहेत, कारण मानव आणि वन्य जीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नव्हे.

देशभरात आज ५० अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. तरी वन्य प्राणी आणि मनुष्यातील संघर्ष वेळीअवेळी उफाळून येतो. मध्य प्रदेशातील शाहडोल येथे २०१८ च्या सुरुवातीलाच विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या स्पर्शाने तर कर्नाटक बंदीपूर येथे दोन वाघ आणि एका हत्तीचा विषप्रयोगाने झालेला मृत्यू वन्यजीव प्रेमींना चटका लावून गेला. १९७२-७३ साली सुरू झालेल्या व्याघ्र प्रकल्पांचा उद्देश केवळ वाघाचे संवर्धन इतकाच मर्यादित नव्हता. किंबहुना त्याला वाघाचे नाव देऊन वन्यजीवांचे नैसर्गिक संरक्षण व्हावे या हेतूने व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती सुरू झाली आणि हिंदुस्थानातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट यांच्या नावे सुरू झाला.

वाघाच्या माध्यमातून जैवविविधतेचे आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे हा व्यापक हेतू त्यामागे दडला आहे. काझीरंगा येथे व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून गेंडय़ाचे, कर्नाटकला बंदीपूर व्याघ्र प्रकल्पात हत्तींचे, सुंदरबन येथे खाऱ्या पाण्यातील मगरी असो अथवा एकेकाळी मेळघाटमधील सर्वात जास्त संख्या असलेले गौर (बायसन) असो, या सर्व लोप पावत चाललेल्या वन्यजीवांना संजीवनी व्याघ्र प्रकल्पांनी मिळवून दिली. व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात होऊन संवर्धनात लक्षणीय यश देखील प्राप्त होऊ लागले. मात्र आता वन्यजीवांच्या आणि नागरिकांच्या समोर नवीन मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

विशेषतः गेल्या काही वर्षांत याबाबतीत विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. त्यातून सृष्टीतील या दोन जिवांचा आपसातला संघर्ष भविष्यातील मोठ्या नैसर्गिक आपत्तीची चाहूल देत आहे. यातून वेळीच बोध घेतला गेला नाही तर येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर कुणाचेच नियंत्रण राहणार नाही. रोजच्या घटना बघता वन्य प्राण्यांचे होणारे मृत्यू आणि नागरिकांचा संघर्ष हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकविणारा आहे. कधी अपघातात, कधी शिकार, कधी विद्युत तारेच्या स्पर्शाने तर कधी मानवी वस्तीत प्रवेश केल्याने झालेली जीवितहानी काळातील भयावह परिस्थितीचा अंदाज देण्यास पुरेशी आहे. भूतकाळातील आकडे बघता हा विषय गंभीर वळणावर उभा आहे.

वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात सक्रिय असलेल्या वाईल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य आणि नागपूर येथील वन्यजीवप्रेमी प्रफुल्ल भांबुरकर यांनी यासंदर्भात काही मौलिक सूचना केल्या आहेत. त्यानुसार या सर्व संघर्षाची तिव्रता कमी करायची असेल तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सौरऊर्जेवर चालणारी विद्युत उपकरणे उपलब्ध करून द्यावी लागतील, अथवा जमिनीखालून विद्युत प्रवाह अथवा विशिष्ट केबलचा वापर करून वन्यजीव व मनुष्यांची धक्कादायक जीवितहानी आटोक्यात आणता येऊ शकेल. वन्यजीवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले तरी त्यामागची कारणे नैसर्गिक आहेत, कारण मानव आणि वन्यजीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नव्हे.

या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश हा होता की विद्यार्थी जो विषय शिकतो याबद्दलची जागृकता निर्माण व्हावी व याबरोबरच वन्य जीवांची ओळख त्यांचे महत्त्व व संगोपन कसे करावे याबद्दलची ही जाणीव त्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कारण वन्य प्राणी हे परिसंस्थेमध्ये खूप महत्त्वाचे कार्य करतात. त्यांचे योगदान खूप मोठे असते. म्हणूनच उपरोक्त ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. बागुल कल्याणी रविंद्र, महाराजा सयाजीराव गायकवाड कॉलेज, मालेगाव हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक एम जी एम कॉलेज ऑफ फाईन आर्ट, नांदेड ची विद्यार्थिनी कु. डाकोरे मोनाली नवनाथ हिने पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले त्यात शासकिय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खांडोळा, या उत्तर गोव्याची विद्यार्थीनी कु. श्रेया चंद्रकांत गावडे व आर. बी. मदखोलकर महाविद्यालय चांदगड, कोल्हापूरची विद्यार्थिनी कु. गावडे वंदना वसंत हिने पटकावला.

या स्पर्धेतील गुणवंताना ई-प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रथम १०००, द्वितीय ७००, व तृतीय ५०० प्रत्येकी देवुन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा.आ.कर्मवीर किशनरावजी राठोड, सचिव प्राचार्य गंगाधररावजी राठोड, मुखेड-कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषारजी राठोड, जि.प.सदस्य मा. संतोषजी राठोड, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. बळीराम राठोड व प्रसिद्धी प्रमुख प्रो.डॉ.रामकृष्ण बदने यांनी सर्व सहभागी स्पर्धक व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.श्रीनिवास पवार, संयोजक प्रा.डॉ.महेश पेंटेवार, परिक्षक नागेश सोनकांबळे, शौकत शेख व अतुल येवतीकर यांच्या प्रयत्नामुळे रांगोळी स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी