नकारात्मक माणूस संधीतही संकटं पाहतो - सुप्रसिद्ध समुपदेशक डॉ. हनुमंत भोपाळे -NNL


नांदेड| सकारात्मकता जीवनात यश आणि आनंद निर्माण करते. नकारात्मकता हे जीवनातले विष आहे. त्यामुळे व्यक्तीने नकारात्मक विचार, भावना व कल्पनांचे तन फेकून द्यावे अन् सकारात्मकतेची बीजं पेरत वाटचाल करावी. सकारात्मक माणसांच्या जीवनातही संकटे येतात; पण त्या संकटातही संधी निर्माण करत सकारात्मक माणूस वाटचाल करतो. सकारात्मक माणसांनी जग घडविले आहे. नकारात्मक माणसाला  संधी दिसत नाहीत, संकटच दिसतात, असे मत सुप्रसिद्ध वक्ते, साहित्यिक तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ  डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आय.क्यू.ए.सी. विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श शिक्षकांचा सत्कार आणि विशेष व्याख्यान सोहळ्यात प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेवराव चामले उपस्थित होते. यावेळी माधव कदम, राम जाधव, मोहन खिंडीवाले, सुमित्रा वट्टमवार, यशवंतराव बिरादार आदी उपक्रमशील शिक्षकांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना डॉ. भोपाळे म्हणाले, कोणत्याही यशासाठी विशिष्ट वेळ देऊन उत्साह आणि आत्मविश्वासाने परिश्रम घ्यावे लागतात. परिश्रमाने मिळविलेल्या यशाची चव काही औरच असते. दुसर्‍या परिश्रमाचे श्रेय घेणारी माणसं विकृत असतात, ज्याच्या कामाचे श्रेय त्याला देणे सुसंस्कृत माणसांचे लक्षण असते, अशी माणसे निर्माण करणे शिक्षण व्यवस्थेसमोरचे आव्हान असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले.

सत्कारास उत्तर देताना राम जाधव यांनी शिक्षण व चांगल्या माणसांच्या सानिध्यामुळे मी कसा घडलो हे सांगितले. याप्रसंगी इंजि. शिवाजीराजे पाटील यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक बाबींवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ विनायक जाधव म्हणाले, शिक्षण माणसाला मोठे करते. मी याच शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन इथेच प्राचार्य झालो, निष्ठेने परिश्रम घेतलेल्या माणसाची कधी ना कधी कदर समाज करतो. डॉ. हनुमंत भोपाळे हे अतिशय उपक्रमशील वक्ते असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असे मत मांडले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व संचालन केले, तर डॉ. किरण गुट्टे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, डॉ. डी.बी. मुळे, डॉ. व्ही.डी. गायकवाड, प्रा. ए.एस. टेकाळे, डॉ. एस.डी. सावंत, डॉ. व्ही.के. भालेराव, डॉ. एच.ए. तिरपुडे, डॉ. रंजन येडतकर, अनंत कदम, प्राध्यापक, विद्यार्थी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी