नांदेड। महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी निरंतर पशुवैद्यकीय शिक्षण अंतर्गत एक दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन नांदेड क्लब येथे
करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्वागत समारंभानंतर मराठवाडा विभागाचे सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. संजय गायकवाड यांनी जंगली प्राण्यावर केलेले विविध उपचार आणि त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन याबद्दल स्व अनुभवातून केलेल्या कार्याच्या लेखाजोखा मांडला. त्यानंतर एल एस डी किंवा लंपी स्कीन आजार आणि त्याचे परिणाम या विषयावर पशुवैद्यकीय विद्यालय परभणी येथील प्राचार्य डॉ. विवेक देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. दिवाकर कुलकर्णी वरिष्ठ संशोधक व शास्त्रज्ञ यांनी प्राण्यांपासून मानवात होणाऱ्या विविध आजाराच्या संक्रमणाबाबत तसेच त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष उपस्थित नांदेड जिल्ह्यातील 100 पशुवैद्यकांना सआधार दर्शवले.
दुपारच्या सत्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्ती पश्चात पशुसंवर्धन व शेतकरी हिताचे काम करणाऱ्या डॉ. माधव साखरे, डॉ. सुनील म्हैसेकर व डॉ. सुभाष जोगदंड यांच्या विशेष कार्याचा गुणगौरव करण्यात आला. तसेच जनावरांची अहोरात्र सेवा करून त्यांचे फळ म्हणून पशुवैद्यकांच्या मुला-मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात घेतलेल्या भरारीची विशेष दखल घेऊन अशा पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. कांचन बुन्नावार, वृषभ गंदिगुडे, आर्या शिंदे, अभिनव खंदारे, ऐश्वर्या बोधनकर,व्यंकटेश बुणावार , अक्षय पाटील, कुणाल गुट्टे, अंजली बंडेवार, आस्था साळवे, प्राजक्ता कांबळे, प्रांजल घुले, जगवी पडगलवार, सौरभ खूने, वैष्णवी कानडखेडकर, वृंदार गायकवाड यांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहोरकर, निबंधक डॉ. रामटेके व सदस्य डॉ. सावंत आणि नांदेडचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नपारखी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महावेट नांदेडचे अध्यक्ष विजय काटकाडे, प्रवीणकुमार घुले, अविनाश बुन्नावार, अजय मुस्तरे, भास्कर बिरादार, प्राणहंस कांबळे, आणि समस्त पशुवैद्यकांनी परिश्रम घेतले.