हिमायतनगर पोलिसांसमोर चोरट्यांच्या टोळीला पकडण्याचे आवाहन
मंदिराच्या दानपेटीचे कुलूप फोडून अंदाजे अर्धा किलो सोने-चांदी, व २५ हजारांची नगदी रक्कम लंपास
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या काही महिन्यापासून तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद थांबला असताना पुन्हा गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी चोरटयांनी दि.२८ च्या मध्यरात्रीला सलामी दिली आहे. अज्ञात चोरटयांनी काळे- पांढरे कपडे परिधान करून तोंडाला दस्त्या बांधून सिरंजनी येथील हनुमान मंदिराचे गेटमधून प्रवेश केला. येथे त्यांनी मारोतीरायाच्या मंदिराच्या दानपेटीचे कुलूप फोडून अंदाजे अर्धा किलो सोने-चांदी, व २५ हजारांची नगदी रक्कम लंपास केली आहे. एव्हडेच नाहीतर गावातील तीन ते चार घरांना लक्ष करून येथे चोरी करत धुमाकूळ घातल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांच्या टोळीला पकडण्याचे आवाहन हिमायतनगर पोलिसांसमोर उभे आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून सिरंजनी गाव प्रसिद्ध आहे. या गावात शेतकरी, कष्टकरी, मजुरदार व सर्व स्तरातील नागरिक गुण्या गोविंदाने राहतात. आत्तापर्यंतच्या काळात या गावात कधीही चोरी झाली नाही असे येथील नागरिक सांगतात. कोणतेही सण -उत्सव व धार्मिक कार्यक्रम सर्वसंमतीने व मोठ्या हर्षोल्लासात पार पडतात. असाच एक मोठा अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा कार्यक्रम या गावात १५ दिवसापूर्वी श्रावण मासात सपन्न झाला. त्यानंतर पोळ्याचा सणही मोठ्या आनंदाने व शांततेत पार पडला आहे. आता येथील ग्रामस्थ आगामी काळात होणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करीत असताना दि.२८ च्या मध्यरात्री १२ च्या सुमारास गावात काही अज्ञात चोरटे शिरले. या चोरट्यानी प्रथमतः येथील मारोतीरायाच्या मुख्य गेटमधून चोंरट्यानी आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी फोडून नुकत्याच झालेल्या सप्ताह व पोळ्याच्या काळात भाविकांनी टाकलेल्या गुप्तदानाची तब्बल अर्धा किलो सोने - चांदीचे दागिने व नगदी रक्कम लंपास केली आहे. हा सर्व प्रकार मंदिर प्रशासन व गावकऱ्यांच्या सहकार्याने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या कॅमेऱ्यात चोरट्यानी तोंडाला पांढरा रुमाल बांधला असल्याने त्यांचे चेहरे झाकले गेल्याचे दिसते आहे.
एकूणच अनेक जणांच्या घरात चोरीचा प्रयत्न चोरट्यानी केला मात्र येथे त्यांचा प्रयत्न असफल झाला असला तरी मारोती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी उत्सव काळात गुप्तदानातून जमा झालेली सोने-चांदीचे दागिन्यांसह नगदी रक्कम चोरीला गेली आहे. या सीसीटीव्हीवरून चोरट्याने पकडून पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी मंदिर कमिटीच्या लोकांसह गावकर्यांनी केली आहे. चोरट्यानी या प्रकारे गावात निर्माण केलेल्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.