नांदेड। माता आणि बालके सुदृढ राहावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने माता व बालकांना सशक्त करण्यासाठी जिल्ह्यात पोषण अभियान राबवले जाणार आहे. दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाईल. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना त्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या.
आरोग्य विभागाच्या वतीने एचआयव्ही एड्स संवेदीकरण कार्यशाळा व महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पोषण महा अभियाना संदर्भात आज नांदेड येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम -कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत त्यांनी एड्स विषयी मार्गदर्शन केले. एड्सची लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय, सामाजिक स्थान व आपली कर्तव्य याविषयी माहिती देऊन पोषण सप्ताह दरम्यान एड्स आजारा संदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन केले.
महिनाभर चालणारा पोषण महा अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. या अभियानातंर्गत जनजागृतीसाठी प्रभाफेरी, दिंडी, विविध स्पर्धा, पोषण व आरोग्य तपासणी मिळावे आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची उपस्थिती होती.