भदंत पंय्याबोधी थेरो यांच्याकडून आंबेडकर यांना अशोकस्तंभाची प्रतिकृती भेट
नांदेड| धम्म प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हाभरात आणि सिमावर्ती जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबवून धम्मचळवळीला गती देणारे खुरगावचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र देशभरात अव्वल दर्जाचे ठरत चालल्याचे भावोद्गार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी काढले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी बोलत होते.
यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ आणि भारतीय बौद्ध महासभेचे मराठवाडा तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी दिनकर हनुमंते, वैभव धबडगे, विलास पगारे, अॅड. रामजी कांबळे, श्रीराम उघडे, दादाराव लहाने, कमलाकर पारधे, किशोर चक्रे, सायस मोडक, रामदास घेवंदे, डॉ. बालाजी सावळे, कुमार सोनकांबळे, संदीप रणवीर, प्रेमानंद मगरे, डी. एन. जाधव, सिद्धार्थ गायकवाड, सतिश इंगोले, राजेंद्र छापाने, देविलाल तायडे आदींची उपस्थिती होती.
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे शहरात कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास सदिच्छा भेट दिली. या निमित्ताने भिक्खू संघाकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी राजरत्न आंबेडकर यांना अशोकस्तंभाची प्रतिकृती भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, १९५६ नंतरची आंबेडकरी चळवळ म्हणजे धम्मचळवळच आहे. ही आंबेडकरी विचारधारा नेटाने घराघरांत पोहचविण्याचे काम भदंत पंय्याबोधी थेरो आणि त्यांचा भिक्खू संघ करीत आहे. केंद्राचे धम्मकार्य भारतीय बौद्ध महासभेस पूरक असून समाजातील दानशूर व्यक्तींनी इथे मोठ्या प्रमाणावर दान देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.