पुणे| 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत' आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान मिळविले आहे. देशात झालेल्यापैकी तब्बल 75 टक्के उपक्रम एकट्या महाराष्ट्रात राबवण्यात आले आहेत.
'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' निमित्ताने 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती खास अमृतमहोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या https://indiaat75.nic.in व https://amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर भरणे अपेक्षित होते. त्यामध्ये संपूर्ण भारतातून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य या चारही स्तरावर सर्वात जास्त 4 लाख 4 हजार 282 इतक्या उपक्रमांचे आयोजन व संकेतस्थळावर माहिती भरून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल झारखंड 48 हजार 704 व गुजरात 42 हजार 396 उपक्रम अंमलबजावणीसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावरील झारखंडपेक्षा तब्बल आठ पट अधिक उपक्रम महाराष्ट्राने राबवले आहेत.
या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाद्वारे ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांची राज्यस्तरावर आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायत व ग्रामपंचायत स्तरावर समन्वय (नोडल) अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. चारही स्तरावर विविध उपक्रमांची अंमलबजावणी व संकेतस्थळावर माहिती भरण्याचे काम करण्यात आले. महाराष्ट्रात राज्यस्तरावरील 21 उपक्रम, जिल्हा परिषद स्तरावर 3 हजार 592, तालुका पंचायत स्तरावर 10 हजार 574 तर ग्रामपंचायत स्तरावर 3 लाख 90 हजार 95 इतक्या उपक्रम आयोजनाची माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली आहे.
'आझादी का अमृतमहोत्सव'च्या शिक्षण घटकांतर्गत मॉडेल स्कुल कार्यक्रम, महिला स्वयंसहायता गटांसाठी थेट खरेदी विक्री स्टॉल उपक्रम, शिक्षक प्रशिक्षण, महाआवास पारितोषिक वितरण, ग्रामीण गृहबांधणी, जीवनोन्नती अभियान उपक्रम आदी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पुणे राज्यात पहिले - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत संकेतस्थळावर 1 लाख 1 हजार 935 उपक्रमांची माहिती भरत पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल अहमदनगर जिल्ह्याने दुसरा व गडचिरोली जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. ग्रामपंचायत स्तरावर राज्यात सर्वाधिक 1 लाख 1 हजार 292 उपक्रमांची माहिती पुणे जिल्ह्याने भरली आहे. पुणे जिल्ह्यातील 1 हजार 385 ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेने सन 2022-23 च्या अंदाज पत्रकात यासाठी स्वतंत्रपणे निधीची तरतूद केली होती.
जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावरील महा पंचायत अभियान, प्राथमिक शाळांमध्ये विविध गुण दर्शन स्पर्धा, पंचायत समिती स्तरावरून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यातील नागरिक, शालेय विद्यार्थी आदींनी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आदी सर्वांनीच या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला म्हणूनच पुणे जिल्ह्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.