अर्धापूर,निळकंठ मदने। अर्धापूर- नांदेड़ महामार्गावर रोडराबरीच्या घटनात वाढ झाली आहे. गुरुवारच्या रात्री नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावरील रोकड पंपमालक नांदेडला दुचाकीवरुन घरी घेऊन जात असतांना पाळत ठेवून चार जणांनी चाकूचा वार करीत पावनेदोन लाख रुपयांची रोख रक्कम व २ मोबाइल चोरट्यांनी लंपास केले, त्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांना या महामार्गावर चोरट्यांनी आव्हान दिले आहे.
गुरुवारी रात्री पावने आकराच्या सुमारास जांभरुन हद्दीतील दुध डेअरीसमोर दैनंदिनप्रमाणे पेट्रोल पंपाची रोकड नांदेड च्या किल्ला गल्लीतील निवासस्थानी पंपमालक महमद मुस्तफा अली खान रा.किल्ला गल्ली नांदेड यांच्यावर माहिती घेऊन ४ जणांनी पाळत ठेवून पाठीमागून पाठलाग सुरु केला. दुधडेअरी जवळ त.यांची दुचाकीला कट मारुन दुचाकी अडविली. पंपमालकाजवळील रोख रकमेची बॅग हिसकावून घेण्यासाठी त्यांच्या हातावर धारदार चाकूने वार करण्यात आला. चाकूने वार होताच पंपचालक खाली पडले अन् क्षणात त्यांच्या जवळील १ लाख ७१ हजार ६० रुपये व १७ हजार रुपयांचे २ मोबाईल असा एकूण १ लाख ८८ हजार ६० रुपयांचा मुदेमाल घेऊन महामार्ग क्र.३६१ वरुन हे चार चोरटे नांदेडच्या दिशेने पसार झाले.
यापुर्वीही एका टेम्पोचा पाठलाग करुन दाभड येथे टेम्पोला लुटले होते. तर आसनाब्रीज जवळ दोन वेळा अर्धापूरातील सराफा दुकानदारावर पाळत ठेवून दुचाकीस्वारांनी लुटले होते. या घटनेचा पोलिसांनी तपास लावला होता,तर बामणी फाट्यावर दिवसा बचतगट वसुली अधिकाऱ्यांस दुचाकीस्वारांनी लुटून यशस्वी पलायन केले होते. या महामार्गावर अनेक दुचाकीस्वारांना पाठलाग करुन लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीसापुढे या चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे,पंपचालक म.मुस्तफा अली खान रा.किल्ला यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ४ आरोपी विरुद्ध अर्धापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक जाधव अधिक तपास करीत आहेत.