नांदेड| भारतामध्ये २०३० पर्यंत जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची क्षमता आहे. ते जागतिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी ५०० अब्ज अमेरिकी डॉलर पेक्षा जास्त जोडू शकते. मेक इन इंडिया ड्राईव्हच्या मदतीने भारत हाय-टेक उत्पादनाचे केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. कारण जागतिक दिग्जजांनी एकतर भारतात उत्पादन प्रकल्प स्थापन केली आहेत किंवा ते स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहेत. भारत सरकार देशातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी निरोगी वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पुढाकार घेत आहे. असे मत हैद्राबाद येथील अॅटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेटचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदिपकुमार यांनी व्यक्त केले.
ते दि. २५ जुलै, रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्तुती’ (सिनरजिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजीकल इन्फ्रास्ट्रक्चर) प्रशिक्षण कार्यक्रम योजनेंतर्गत सात दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रमुख उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कोल्हापूर येथील डॉ. आर.जी. सोनकवडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, समन्वयक राजाराम माने, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे प्रदिपकुमार मनाले की, विविध तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या संशोधनास वेगळे महत्व आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आणि संशोधन यांची सांगड घालणे महत्वाचे आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. आर.जी. सोनकवडे यांनी त्यांच्या विद्यापीठातील उपलब्ध असलेली तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्याचबरोबर अत्याधुनिक विश्लेषणात्मक साधन सुविधा आणि अत्याधुनिक उपकरणे वापरून संरचनात्मक वैशिष्टीकरण कसे करता येईल. यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय सामारोपामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, काळाची गरज लक्षात घेवून दोन्हीही विद्यापीठ एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आपल्या भागातील संशोधक विद्यार्थ्यास संशोधन करण्यासाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील उपलब्ध असलेले तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे. या साधनसामुग्रीचा उपयोग प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी करून घेवून आपले भवितव्य उज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्व प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजाराम माने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यामध्ये ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना जर संशोधन क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील शास्त्रीय उपकरणे हाताळणे, दुरुस्त करणे आणि आणि त्याचा संशोधनासाठी वापर करणे हे अनिवार्य आहे. या कार्यक्रमास विद्यापीठातील संकुलामधील विद्यार्थी तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अरविंद सरोदे यांनी केले.