उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला स्थापनेपासून संरक्षण भिंत नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सार्वजनिक जागा समजून आपल्या गरजेनुसार वापरात घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यावर त्यांचा परिणाम जाणवत आहे. या सर्व गोष्टी बंद करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच व ग्रामसेविका यांना शाळेला संरक्षण भिंत बांधून देण्यासह शाळेच्या प्रांगणात अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
दि. ५ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून विद्यार्थी आणि शाळेच्या परिसरात भविष्यात काय करणे गरजेचे आहे. याविषयी सविस्तर चर्चा करून ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला. या विषयी मागणीच्या निवेदनात "शाळेत दररोज सकाळी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रगीत, प्रार्थनावेळी पावसामुळे मैदानावर चिखल साचत आहे. मैदानावर डस्ट, बारीक चूरी टाकावी, नवीन शाळा खोली समोर मुरुम टाकावा, शाळेसाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी १५ वित्त आयोगातून मंजूरीसाठी तात्काळ पुढाकार घ्यावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
शाळेच्या मैदानावर टेंपो, जनावरे, उभे करणे सारखे प्रकार बंद करण्यात यावेत, शाळेच्या परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी. विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजनानंतर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे " अशा मागणीचे निवेदन सरपंच व ग्रामसेवक यांना देण्याचे बैठकीत ठरले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सोयीसुविधा उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यावर परिणाम होणार नाही.ग्रामपंचायत या निवेदनावर काय भूमिका घेणार याकडे शिक्षणतज्ज्ञ लोकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण काळम, धनंजय घोरबांड, राम मोरे, जावेद सय्यद, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी कचरू पाटील घोरबांड, गणेश लोखंडे, उपस्थित होते. या बैठकीत सह शिक्षिका आशा डांगे यांच्या वाढदिवसा निमित्त समितीच्या वतीने शाल, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डांगे यांनी शाळेच्या प्रांगणात ट्रि गार्ड सह झाड लावणार असल्याचा संकल्प केला. उपस्थित सर्व समिती सदस्य यांनी आपापल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शाळेच्या परिसरात ट्रि गार्ड सह वृक्षारोपण स्वखर्चाने करण्यात येईल असे सांगितले. या बैठकीत मुख्याध्यापक जयवंत काळे, सहशिक्षक एकनाथ केंद्रे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची व आवश्यक बाबींची माहिती दिली.