नांदेड| १९ वी अमरनाथ यात्रा सुखरूप परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी २० व्या अमरनाथ यात्रेसाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली दुसरा जत्थ्यातील शंभर यात्रेकरूपैकी ७८ यात्रेकरू हमसफर एक्स्प्रेसने जम्मू कडे आणि २२ यात्रेकरू हैदराबाद ते श्रीनगर विमानाने रवाना झाले असून त्यांना विविध संघटनाद्वारे ढोल ताशांच्या निनादात पुष्पवृष्टी करत नांदेडकरांनी शुभेच्छा दिल्या.
नांदेड रेल्वे स्थानकावर भाजप,शिवसेना, काँग्रेस, विश्व हिंदू परिषद, अमरनाथ यात्री संघ, आर्य चाणक्य सेना, परशुराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी केली. मोत्याची माळ, हार, पुष्पगुच्छ देऊन भाविकांचा सन्मान करण्यात आला. तेरा दिवसाच्या या प्रवासात यात्रेकरू अमरनाथ सोबतच वैष्णोदेवी,जम्मू, श्रीनगर ,गुलमर्ग, सोनमर्ग, अमृतसर, अटारी बॉर्डर या धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहेत. आठ राज्यातून ५२०० किमी चा प्रवास करण्यात येणार आहे. यात्रेकरूंच्या जेवणासाठी महाराष्ट्रीयन केटरिंग टीम सोबत घेण्यात आली आहे.
यात्रा यशस्वी करण्यासाठी टूर मॅनेजर म्हणून विशाल मुळे, संजय राठोड व लक्ष्मीकांत हे परिश्रम घेत आहेत. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी शशिकांत पाटील, ॲड. चिरंजीलाल दागडिया, राजू मोरे, एकनाथ ब्राह्मणवाडेकर, राजेशसिंह ठाकूर, अभिजीत पाटील, सुधीर विष्णुपुरीकर, प्रा. नंदकुमार मेगदे, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, सुमित्रा मेगदे, मुखेडकर काकू, प्रभुदास वाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नांदेडकर उपस्थित राहिल्याबद्दल संयोजक दिलीप ठाकूर यांनी सर्वांना धन्यवाद दिले.