वर्षा ठाकूर-घुगे: बहुआयामी व्यक्तिमत्व - मिलिंद व्‍यवहारे, नांदेड -NNL


नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखून दिलेल्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नांदेड जिल्‍हयाची वेगळी ओळख राज्‍यात निर्माण झाली आहे. त्‍या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत उत्साहाने काम करतात त्‍यामुळेच कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे. आश बहुआयामी व्‍यक्तिमत्‍व असणा-या वर्षा ठाकूर-घुगे यांचा आज दिनांक 10 जून रोजी वाढदिवस.

      वर्षा ठाकूर-घुगे या बहुआयामी व्यक्तिमत्वाने आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. स्वच्छ माझे कार्यालय, सिक्स बंडल सिस्टिम, तालुका पालक अधिकारी, महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम, जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण, पालकांशी सुसंवाद, माजी विद्यार्थ्‍यांच्‍या मेळाव्‍यातून शाळांची समुध्‍दी, गाव तेथे खोडा, सुंदर माझे कार्यालय, माझे गाव सुंदर गाव, लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा उपक्रम तसेच दुर्गम भागाला भेटी आणि जिल्ह्यात केलेल्या कोरोना काळातील व्‍यवस्‍थापन यामुळे वर्षा ठाकूर-घुगे यांची कार्यपद्धती नांदेड जिल्ह्यात कौतुकास्‍पद ठरली आहे. विविध उपक्रमात सुनोनेहा, माझी मुलगी माझा अभिमान, गाव तेथे खोडा, गाव तेथे स्मशानभूमी व आई- बाबांची शाळा हे उपक्रम लोकाकाभिमूख झाले आहेत. 

सुनोनेहा - नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी व शाळेतील बालकांचे दृष्टिदोष आणि कर्णदोष या आजाराविषयी आरोग्य तपासणी कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या संकल्पना मधून राबविण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात कार्यरत आरोग्य पथके, विशेष विषय शिक्षक आणि सर्व शिक्षा अभियानातील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोहीम नांदेड जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली. दिनांक 1 जानेवारी 2022 ते 30 एप्रिल 2012 अखेरपर्यंत आरबीएसके आरोग्य पथकामार्फत एकूण 1502 शाळा आणि अंगणवाड्या पैकी 3385 शाळा व अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली. 

एकूण सहा लाख 68 हजार 463 शाळा व अंगणवाडयातील विद्यार्थ्यांपैकी पाच लाख 33 हजार 267 शाळा व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून तपासणी मधून आळशी डोळा 262, मोतीबिंदू 59, तिरळेपणा 1096, नेत्रदोष 2282 आणि कर्णदोष 636 इतक्या बालकांचा आरोग्य पथकामार्फत शोध घेण्यात आला. शोध घेण्यात आलेल्या बालकांची तालुकास्तरावर ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय येथे मार्च 22 मध्ये संदर्भसेवा शिबिर आयोजित करून संदर्भीय बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच तालुकास्तरीय शिबिरातून पुढील आवश्‍यक निदान आणि उपचार यात करिता जिल्हास्तरावर 24 ते 26 मार्च दोन या कालावधीमध्ये शिबिर आयोजित करून सदर बालकांवर उपचार करण्यात आले. लायन्स क्लब नेत्र रुग्णालय नांदेड यांच्या मार्फत ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी डोळ्यासाठी केलेल्या पालकांचे निदान आणि उपचार करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम आणि लायन्स क्लब यांच्यावतीने 740 पात्र बालकांपैकी 468 बालकांना मोफत चष्मे देण्यात आले.

 


जिल्हास्तरावरील शिबिरांमधून squint 42, cataract 23, ptosis 16, इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी 23 असे एकूण 104 बालिके डोळ्यांच्या शस्त्रक्रिया साठी पात्र झाले असून सदर बालकांच्या दिनांक 2 मे रोजी पासून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे शस्‍त्रक्रिया करण्यात येत आहेत. तसेच एकूण 36 बालके हृदयशस्त्रक्रियासाठी पात्र झाले. सदर बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया 1 मे 2022 रोजी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय वर्धा आणि नेल्सन हॉस्पिटल नागपूर येथे मोफत करण्यात आले आहेत. दृष्टिदोष आणि कर्णदोष विशेष तपासणी मोहीम अंतर्गत रेकॉर्ड आणि अहवाल संकलनासाठी सुनोनेहा अँड्रॉइड ॲप तयार करण्यात आले असून सदरील अॅप मध्ये शोध घेतलेल्या पात्र बालकांचे ट्रेकिंग व अपडेशन करण्यात येत आहे. सदरील आजचे 1 मे 2022 रोजी राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या अभिनव उपक्रमांमधून शालेय विद्यार्थ्‍यांचे कर्णदोष आणि दृष्टीदोष वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे जात आहे.

माझी मुलगी माझा अभिमान - नांदेड जिल्हा परिषद कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असते. याच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास घेत जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अभिनव संकल्पनेतून  महिला व मुलींच्या सक्षमीकरणाला अधिक बळकटी देण्यासाठी माझी मुलगी माझा अभिमान हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

    मुलगी हे परक्याचे धन तर मुलगा हा वंशाचा दिवा ह्या समाजात असलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेला छेद देण्यासाठी, मुलगी सुद्धा घराचा एक अविभाज्य घटक आहे, घराच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा तितकाच महत्त्वपूर्ण सहभाग आहे, मुलींच्या विकासाला, प्रगतीला मुलांच्या विकासाएवढीच घरातून मिळणारी साथ आहे. ह्या बाबी अधोरेखित करण्यासाठी मुलीच्या नावाची पाटी घरावर लावणे या उपक्रमाची सुरुवात झाली.

      सदर योजनेची तळागाळापर्यंत प्रचार व प्रसिद्धी व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्‍ह्याचे मा.पालकमंत्री महोदय, सर्व सन्माननीय खासदार महोदय, सर्व सन्माननीय आमदार महोदय, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद पदाधिकारी, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, सर्व प्रशासकीय अधिकारी यांना मुलींच्या नावाच्या पाट्यांचे वितरण करून सदर लोकचळवळीला सुरवात करण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांनीसुद्धा आपल्या घरावर मुलींच्या नावाच्या पाट्या लावल्या. या उपक्रमाचा आदर्श घेत अनेक गावांनी लोकसहभागातून मुलींच्या नावाच्या पाट्या लावत पूर्ण गावाच्या गावे यामध्ये उस्फूर्तपणे सहभागी झाली आहेत. हा उपक्रम आता एक प्रशासकीय कार्यक्रम न राहता लोकांच्या स्वाधीन होऊन एका लोकचळवळीच्या रूपात गावोगाव राबवला जात आहे. 

      यानंतर ज्या लोकचळवळीचे परिणाम स्वरूप नांदेड जिल्ह्यातील अनेक गावातून घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या घरावर लावण्यात आल्या आहेत मार्च 2021 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा उपक्रम सर्व गावांमध्ये राबवण्याचा ठराव घेण्यात आला.  सदर उपक्रमाचे फलित स्वरूप म्हणजे लोकांमध्ये सदर उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेत हळूहळू सकारात्मक बदल दिसून येत आहे त्यामध्ये पालक मुलींच्या उच्च शिक्षणामध्ये गुंतवणूक करण्यात पुढे येत आहेत तर मुलींचे शाळेमधील गळतीचे प्रमाण हे जवळजवळ नगण्य झाल्याचे दिसून येत आहे.

     तसेच NFHS 5 प्रमाणे नांदेड जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे जे की यापूर्वी 888 असे होते.  या उपक्रमाचे एक फलित म्हणून असेही दिसून येते की जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार महिला व मुली बाबत होणाऱ्या घरगुती हिंसाचार व बालविवाहाचे प्रमाण यामध्येसुद्धा लक्षणीय प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास येत आहे.

     समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये मुलींचा व महिलांचा असणारा सहभाग यामध्ये लक्षणीय प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत  असणाऱ्या मुली व महिला आत्मविश्वास पूर्वक वावरत असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाला राजकीय इच्छाशक्तीचे सुद्धा समर्थन मिळाल्यामुळे हा उपक्रम जनमाणसात चांगल्या प्रकारे राबवले जात आहे व त्याच्या शाश्वततेची एक खात्री निर्माण झाली आहे.

    नांदेड जिल्हा परिषदेला भेट दिलेल्या विधिमंडळाच्या पंचायत राज समिती, विमुक्त जाती व भटक्या जमाती समिती, अनुसूचित जाती व जमाती समिती यांनीसुद्धा सदर उपक्रमाचे कौतुक करून जिल्हा परिषदेच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. राज्यस्तरावर होणाऱ्या वेगवेगळ्या बैठका व परिषदा यांच्या माध्यमातून सुद्धा या उपक्रमाचे कौतुक झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी विभागीय स्तरावर झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

आई बाबांची शाळा - कोविडमुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याची प्रक्रिया सुरू होण्यास विलंब लागण्याची शक्यता गृहीत धरून शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना कशा पद्धतीने अध्यापन करता येईल याबाबत विचारविनिमय सुरू झाला.

   इयत्ता पहिली व दुसरीची मुले जर शिक्षणापासून वंचित राहिली तर त्यांना इयत्ता तिसरी पासून  पुढचा कुठलाही अभ्यासक्रम समजणार नाही या बाबी लक्षात घेऊन या मुलांचा अभ्यास कशा पद्धतीने सुरु करता येईल याबाबत विचार करून नियोजन करण्यात आले. यादृच्छिक पद्धतीने काही पालकांना यासाठी तयार करण्याचे नियोजन करण्यात आले.यासाठी प्रारंभी प्रत्येक तालुक्यातील 10 याप्रमाणे 160 पालक जर तयार करून त्यांच्या मार्फत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने तयार केलेले अभ्यासक्रमाचे कॅलेंडर त्यांना देण्यात आले. 

     प्रारंभी या शिक्षक या पालकांची ऑनलाईन नोंदणी करून घेण्यात आली. ऑनलाईन नोंदणी नंतर संबंधित पालकांना विद्यार्थ्यांचा कुठला अभ्यास घ्यायचा आहे, रोज कुठला घटक कशा पद्धतीने घ्यायचा याबाबत संपूर्ण नियोजन अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांना ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये देण्यात आलाआहे. विद्यार्थ्यांसाठी दिलेला रोजचा घटक विद्यार्थी पूर्ण करीत आहेत का एवढेच अवलोकन  पालकांनी करायचे आहे आणि त्याबाबत याची नोंद त्यांनी घ्यायची आहे.

      पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना मुलांना कसे शिकवायचे याचे धडे जिल्हा परिषदेच्या वतीने आणि डाएट च्या वतीने देण्यात आले. शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करावा, धडा कसा शिकवावा मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड कसे करावे, याचे शैक्षणिक तंत्रज्ञान पालकांना शिकविण्यात आले. भाषा व  गणित या दोन विषयांवर या संपूर्ण नियोजनात भर देण्यात आला.

   प्रत्येक रविवारी पालकांची ऑनलाईन चाचणी घेतली. मंगळवार ते शनिवारपर्यंत पालक मुलांना शिकवू लागले. जेमतेम शिकलेले पालक विद्यार्थ्यांना शिकवू शकतात अशा सोप्या पद्धतीने याचे मोड्यूलची निर्मिती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर जिल्ह्यातील सर्व इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांच्या मार्फत  अभ्यास घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. 1343 शाळांमधून 34 हजार विद्यार्थी आई बाबांच्या शाळेत समाविष्ट झाले. आई बाबांची शाळा म्हणूनच एक आगळावेगळा उपक्रम ठरला.

मिशन आपुलकी - लोकसहभागातून साहित्य मिळवण्यासाठी मिशन आपुलकी हा उपक्रम तयार करण्यात आला. 15 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ऑगस्ट 2021 ते एप्रिल 2022 या काळात मिशन आपुलकी यातून नांदेड जिल्ह्यातील शाळांना विविध साहित्य प्राप्त झाले. त्यात साऊंड सिस्टम, लोखंडी गेट, एलईडी टीव्ही, प्रोजेक्ट  ,डायनिंग टेबल, स्वच्छता गृहाची दुरुस्ती, छोटी दुरुस्ती, शाळेसाठी रोड, शाळेसाठी जागा, क्रीडा साहित्य, संगणक संच तारांचे कुंपण, ट्री गार्ड, स्वाध्याय पुस्तिका, वृक्षारोपणाचे साहित्य, वही-पेन, प्रिंटर आदी प्रकारचे साहित्य, शाळांची रंगरंगोटी व बाला संकल्पनेनुसार आरेखन आरेखन यातून करण्यात आले आहे.

गाव तेथे स्‍मशान भूमी (दफन दहन व दफनभूमी) - आयुष्‍यभर जीवन जगल्‍यानंतर मृत व्‍यक्‍तीला सन्‍माने निरोप देतांना अंत्‍यविधीसाठी गावस्‍तरावर स्‍मशानभूमी आवश्‍यक आहे. जिल्‍हयातील अनेक गावात स्‍मशनभूमी नसल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना लक्षात आले. त्‍यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने काढले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये (दहन व दफनभूमी) उपलब्ध नाही अशा ठिकाणी गायरान जमीन किंवा खाजगी जमीन उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने गाव तिथे समशान भूमी (दहन व दफनभूमी) संकल्पना राबवणे परिपत्रक निर्गमित करण्यात आले. 

सदर उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतीमध्ये मोहीम स्वरूपात काम करून गायरान जागा उपलब्ध करून देण्यात आली. तशी मंजुरी जागेची सनद मा. पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते जिल्‍हा परिषद प्रांगणात झालेल्‍या कार्यक्रमात संबंधीत ग्रामपंचायतीस देण्यात आली. 120 ग्रामपंचायतीमधील स्मशानभूमीसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहेत. तसेच सदर संकल्पना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून जनसुविधा योजना अंतर्गत स्मशानभूमी दफनभूमीचा भौतिक विकास करण्यात येतो.

गाव तेथे खोडा  मानवा बरोबरच मुक्या प्राण्यांनाही आरोग्याच्या सुविधा महत्त्वाच्या असतात. ग्रामीण भागात पशुधनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी गाव तेथे खोडा हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हाती घेतला आहे. आता गावागावात खोडा प्राप्त होत असल्‍यमामुळे जनावरांच्या आरोग्य उपचारासाठी सोयीचे झाले आहे. मानव विकास अंतर्गत 546 आणि जिल्हा परिषद सेस अंतर्गत 80 असे 626 एकूण खोडे जनावरांना दवाखान्यात आणि ग्रामीण भागात विविध प्रकारचे रोगनिदान व औषधोपचार आणि तपासण्या करताना नियंत्रित करण्यासाठी खोड्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे त्यामुळे जनावरांना, जनावरांच्या मालकांना आणि पशुवैद्यकांना होणारी दुखापत अथवा इजा यापासून मोठ्याप्रमाणावर बचाव झालेला आहे आणि सुरक्षित रित्या जनावरांची हाताळणी करून त्यांना विविध प्रकारचे औषधोपचार रोगनिदान सुलभतेने करण्यात येत आहे. 

     समाजातील अतिशय दुर्लक्षित समजले जाणारे क्षेत्र म्हणजे पशुसंवर्धन त्या अंतर्गत येणाऱ्या विविध जनावरांना (गाई, म्हशी,घोडा, गाढवे, शेळ्या मेंढ्या इ.) सुलभतेने व सुरक्षितपणे रोगनिदान व औषधोपचार करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी योजना राबविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व पशुपालकांना मध्ये तसेच पशुवैद्यकाने मध्ये सुरक्षीततेचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

      मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची झोकून देऊन काम करण्याची खास वृत्ती. त्या सतत जिल्हाभरात फिरून कामाचा आढावा घेतात. लोकांशी बोलतात. लाभार्थ्यांची चर्चा करतात. लोक प्रतिनिधींशी संवाद साधतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतात आणि मार्गदर्शन करतात. किनवट हा नांदेड जिल्ह्याचा अगदी टोकाचा भाग या भागाला भेट देणाऱ्या वर्षा घुगे या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत. अत्यंत दुर्गम आणि खडतर अशा भागात रस्ता आणि इतर पायाभूत सुविधा देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. प्रबोधन, प्रोत्साहन, शाबासकी आणि चुकीला शिक्षा असा फंडा त्यांनी आपल्या सहकारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत अनुसरला आहे. त्यामुळे सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पुढेही अनेक नवनवे उपक्रम त्‍यांच्‍या हातून घडो हीच अपेक्षा. वाढदिवसानिमित्‍त त्‍यांना कोटी-कोटी शुभेच्‍छा

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी