पाचशे हेक्टरवरील केळी पिक बागायतदारांना मोठा दिलासा
नांदेड/हिंगोली। हिंगोली लोकसभा मतदारसंघात बुधवारी (ता.आठ) अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्याने जवळपास ५०० हेक्टरवरील केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकरी संकटात सापडला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन सदरील केळी पिकाच्यां झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केल्या नंतर कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशे हेक्टर केळी पिक बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बुधवारी झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यातील गिरगांव, कुरुंदा, सोमठाणा, दाभडी ,कानोसा, खाजमापुरवाडी, बागलपार्डी, परजना व आजुबाजूच्या परिसरातील २५ ते ३० गावांमध्ये प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे जवळपास ५०० हेक्टर वरील केळी पिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असुन, मोठ्या प्रमाणात घरांची देखील पडझड होऊन नुकसान झाले आहे. या आवकाळी पावसाचा अनेक ठिकाणी गुरे - ढोरे यांना देखील फटका बसला आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असून हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची तातडीने भेट घेऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती.
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी देखील खासदार हेमंत पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत संबंधीत अधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे, हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती.