पावसाचे पाण्याने हुजपा शाळेच्या रस्त्यावर साचले तळे; विद्यार्थी नागरिकांची कसरत -NNL

नळयोजनेच्या नावाखाली शहरात खोदलेल्या रस्त्यावर चिखालचे साम्राज्य 


हिमायतनगर, अनिल मादसवार। शहरात नळयोजनेच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवल्याने काल रात्रीला झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील बहुतांश गल्ली बोळातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर हुजप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाच्या पाण्याने तळे साचले आहे. ये - जा करताना शालेय विद्यार्थी, नागरिक, अबाल वृद्धांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाचे अक्षमय दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि या भागात राहणाऱ्या नागरीकातून केला जात आहे. 


मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर शहरात रिमझिम पाऊस सुरु होता, अल्पश्या पावसानं अनेक रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने रास्ता चिखलात रुतला आहे. काल दि.२१ च्या रात्रीला झालेल्या दमदार पावसाने  हिमायतनगर शहरातील हुजपा शाळेसह अनेक ठिकाणच्या रस्त्यावर तळे साचले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी जागेवर मुरून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या शाळांची सुरुवात झाली असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षक सुरु आहेत. त्यामुळे या घाण पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढताना नाके नऊ येत आहेत.

शहरातील वॉर्ड क्रमांक ११ मध्ये माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व महाविद्यालय आहे. तसेच याचा भागात डॉ.दामोधर राठोड यांचे हॉस्पिटल, कॉम्पुटर सेंटर, दूध डेअरी, शिकवणी वर्ग आहेत. या भागात ये - जा करणाऱ्या रस्त्यावर नगरपंचायतीने नाल्याचे बांधकाम केले नसल्याने आणि नळयोजनेच्या पाणीपुअरवठा पाइपलाइनच्या नावाखाली लाखो रुपये खर्चून करण्यात आलेले सिमेंट रस्ते फोडून ठेवल्याने येथे पाणी साचून डबके तयार झाले आहे. या डबक्यातून वाहनांची ये- जा होत असल्याने परिसर चिखलमय झाला असून, हा प्रकार पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे निर्माण झाला असल्याचे नागरिक सांगत आहेत. 


खरे पाहता नळ योजनेचे काम करण्यापूर्वी ठेकेदाराने पैनगंगा नदीवर पाण्याच्या टाकीचे निर्माण केल्यानंतर शहरातील नळयोजनेचे काम सुरु करायला पाहिजे होते. मात्र शासनाकडून मंजूर झालेला निधी लाटण्याच्या उद्देशाने पाण्याच्या टाकीचे बांधकाम न करता ठेकेदाराने नपच्या अधिकारी, अभियंत्यांना हाताशी धरून शहरात कोट्यवधींच्या खर्चातून करण्यात आलेली सिमेंटचे रस्ते नळ योजनेची पाईपलाईन करण्याच्या नावाखाली फोडली आहेत. त्यामुळे शासनाकडून शहरातील रस्त्यासाठी मिळालेल्या कोट्यवधींचा निधी मातीत गेला आहे. बहुतांश रस्ते व नाल्याची कामे बोगस पद्धतीने झाली असून, अल्पावधीतच रस्ते मातीत मिसळले आहेत. हा विकासकांचा बोगसपणा शासन व जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून १९ कोटीच्या नळयोजनेच्या कामाच्या नावाखाली अगोदर रस्ते फोडून पाईपलाईन करण्याचा घाट रचल्या गेला आहे. यामुळे शहरात विकास कामाच्या योजना केवळ ठेकेदार, अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांच्या फायद्यासाठी राबविल्या जात आहेत कि काय ..? अशी शंका विकासप्रेमी नागरीकातून व्यक्त केली जात आहे .


काल झालेल्या पावसामुळे जिकडे तिकडे चिखल झाला असून, पाणी साचून राहिल्याने आणि घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. या प्रकारामुळे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितल्या जाणारे आपले शहर सुंदर शहर हि संकल्पना मोडीत निघाल्याचे यावरून दिसते आहे. चिखलमय रस्ते, साचलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढताना अनेकांना साथीचे आजार होण्याहची भीती व्यक्त केली जात आहे. या समस्येपासून दिलासा देण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने चिखलमय झालेल्या रस्त्यावर चुरी टाकून सर्वच प्रभागातील रखडलेल्या नाल्याचे बांधकाम करून घाण पाण्याची विल्हेवाट लावावी आणि शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्याची बाब लक्षात घेता संबंधित ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्त करून घ्यावे अशी रास्ता मागणी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, व्यापारी व अबाल वृद्धाकडून केली जात आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी