लोहा| गावाच्या लगत आंबराई... त्यात उन्हाळ्यात आंब्याला पिकलेले पाड...त्यानंतर खुडी...चेळ ( जाळी) घेऊन उतारी...त्याला पाच -सहा फाडी आंबे गेल्या नंतर सगळ्या आंब्याचा घरात माच ..आणि आठ दहा दिवसा नंतर पिकलेल्या आंब्याचा गोड..आंबट रस चाखायची मजा काही औरच..पण हे सगळं आता इतिहास जमा झालं.... कलम केलेले आंबे..आणि..पूर्ण पकायच्या पूर्वीच तोडून आणलेले ..त्यावर पावडर टाकून पिकवलेल्या ..आंब्याने आज बाजार काबीज केला आहे..या कृत्रिम व औषध टाकून पिकवलेले आंबे मानवी शरीरासाठी घातक ठरत आहेत.. कँसर सारख्या रोगांची वाढ झाली आहे..या सिस्टीमला कोणी आवर घालील काय(?) असा सवाल आता उपस्थित होतो आहे.
गावाच्या लगत आमराई असायची ...प्रत्येक गावात आजूबाजूच्या भागाच खास नाव असते.(.जसे गव्हाळी.. भदभदी.. चारही आंबे...जोडनदी ..)तसेच आंब्याचे नाव ही असत ..घुळघुळ्या.. गोटी.. केल्या... ढवळी.. नाकड्या.. चिपट्या ..भद्या.. गडग्या..अशी कितीतरी नाव ..या आंब्याना त्याच्या आकारावरून.. त्याच्या रंगावरून..त्याच्या कोईवरून पडलेली असायची...आंबे साधारणतः एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्या पासून यायची..तत्पूर्वी आमराई राखणारे कच्चे आंबे झाडाला दगड-धोंडे मारून पाडू द्याचे नाहीत..पण भल्या सकाळीच झाडा खाली जाऊन पडलेली आंबे सावडून आणली जायची..मग पाड झाली की ते आंबे उतरायची. गोड आंब्याची कोय घरच्या बाजूला ..उकांड्यावर पुरून ठेवायची आणि पावसाळ्यात ते आली की शेतात जाऊन ते रोप लावायचे..पुढच्या पिढीची सोय व्हावी यासाठी हे झाड लावला जायचं
उतारू स्वतःचे चेळ ( म्हणजे दोरी पासून विणलेले जाळे .खुडीत आलेले आंबे त्यात टाकायचे आणि ते हळूहळू फांदीवरून खाली सोडायचे..खाली असलेला चेळ धरणारा ते आंबे ढिगावर हुळूच टाकायचा ..त्या चेल्यात एका वेळी साठ सत्तर आंबे बसायचे) खुडी घेऊन याचा मोठं झाड असेल तर दोनही दिवस लागायचे...या उतारुला पाच फाडी द्यायचे ( एक फाड म्हजे सहा आंब्याची आणि पाच फाडी मोजल्या की उतारुला एक फाड टाकायची म्हणजे आबा जेवढा असेल त्या प्रमाणात ५:१प्रमाण समजा) शिवाय त्याच झाडांच्या खाली आपली खूण करून आंबे पिकवायला घालायचे ..हे सगळं ऐंशी -नव्वद च्या दशका पर्यन्त सुरू होत..गावरान आंब्याच्या बागेचे नव्या पिढीने जतन केले नाही. झाड मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी वाळून गेली आणि काही तोडली गेली..वडिलोपार्जित आंब्याच्या कोयीचे कलम नव्या तरुण शेतकऱ्यांची संक्रमण केले नाही आणि गावढाली आंबे नामशेष झाली.
आता शेताच्या बांधावर..शेतात दोन तीन एकरात आंबे आहेत पण ते कलम केलेले..पाच सहा वर्षात त्याला आंबे लगडलेले..आणि ती पिकण्या पूर्वीच तोडून त्याला औषध टाकून पिकविणारी बेपारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात उदयास आली. लोह्याच्या बाजारात जेथे बाचोटी.. आंबूलगा, गोगदारी, गऊळ, डोंगरगाव, किरोडा, लोहा, पारडी सावरगाव, असा भागातील गोडचुटुक .. सरभरीत आंबा आता दुर्मिळ झाला. आणि पावडर टाकून पिकविलेल्या आंब्याची आवक वाढली. पूर्वी नगावर विकली जाणारी आंबे आता किलोन विकताहेत..आंबे खायला सुट्टीत मामाच्या गावी जाऊन आंबे खायची मज्जा आता राहिलीच कुठे.
नव्या शेती तंत्रज्ञानात पीक -फळ वाढ व उत्पादनासाठी वारेमाप होणार औषध-खत-फवारणीचा वापर -डोस त्या पीक-फळ-भाजीपाला यासाठी हानीकारक ठरत आहे. आपण हे फळ-आंबे बाजारातून आणून फार गोड आहेत. म्हणून खातो आहोत पण त्याचा दुष्परिणाम शरीरावर होत आहे. राज्य सरकार सोबतच ग्राहक जनजागृती मंचाने असा पावडरात पिकवलेल्या आंबे तसेच इंजेक्शनचा वापर करून गोड व लालबुंद टरबूज विक्रीसाठी आणणाऱ्या यंत्रणे विरुद्ध कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी व फळ उत्पादकांनी नफेखोरीच्या मागे न धावता किमान मानवाचा विचार करायला पाहिजे .बाजारात पावडर टाकून पिकलेल्या आंब्यावर बंदी आणण्याची गरज आहे.