नांदेड। सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावाची स्वच्छता अबाधित ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून येत्या पंधरा दिवसात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज शुक्रवार दिनांक 6 मे रोजी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, डॉ. नामदेव केंद्रे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उप अभियंता पी. एस. वाडेकर, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, मिलिंद व्यवहारे आदींची उपस्थिती होती.
हागणदारीमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यात गाव स्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेऊन गाव स्वच्छ व निर्मल करण्यात येणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यातील 312 ग्रामपंचायतीमधील कामांचा आढावा सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज घेतला. या अंतर्गत स्थानिक पातळीवर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डयांची निर्मिती तसेच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा प्रवाह आहे अशा ठिकाणी स्थरीकरण तळे तयार करणे, वैयक्तिक व सार्वजनिक शोषखड्डे करणे तर गावातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नँडेप, खत खड्डा तयार करणे आणि प्लास्टिक मुक्तीसाठी संकलन केंद्राची निर्मिती करून कचरा व्यवस्थापन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
गावपातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनातील कामांना वर्क ऑर्डर देणे, मार्क आऊट दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून येत्या पंधरा दिवसात कामे पूर्ण करुन झालेल्या कामांचे संकेतस्थळावर ऑनलाइन करण्याच्या सूचनाही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. या बैठकीला जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा तज्ञ, सल्लागार, तालुका गट समन्वयक, समुह समन्वयक व संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीअंतर्गत जल जीवन मिशन मधून वैयक्तिक तसेच शाळा-अंगणवाडी नळ जोडणी देणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम तसेच वृक्ष लागवडीच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामसेवकांनी कामे करणे आवश्यक आहे. गावाचा कायापालट करण्याची ताकद ग्रामसेवकात आहे. यापूर्वी जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन उत्कृष्ट कामे केली आहेत. भोकर तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन स्मार्ट ग्राम करण्याचा संकल्प केला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ईतर ग्रामसेवकांनीही गावे स्मार्ट करावीत असे आवाहन या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.
ग्रामसेवकांच्या पुढाकाराने भोकर तालुक्यातील गावे स्वच्छ व सुंदर होत आहेत. गट विकास अधिकारी अमित राठोड यांनी सुयोग्य पद्धतीने नियोजन करून ही कामे केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी गटविकास अधिकारी अमित राठोड यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी अमित राठोड यांनी लोकसहभागातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
जिल्ह्यातील 312 ग्रामपंचायती मधून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. यात अर्धापूर तालुक्यात 12, भोकर 7, बिलोली 18, देगलूर 32, मुदखेड 13, मुखेड 24, नायगाव 21, नांदेड 27, हिमायतनगर 10, कंधार 19, धर्माबाद 22, किनवट 24, लोहा 16, माहूर 9, उमरी 17 तर हादगाव तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.