औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे – उद्योग मंत्री सुभाष देसाई -NNL


नवी दिल्ली|
मराठवाड्यातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अशी मागणी उद्योग तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना आज येथे केली.

राजीव गांधी भवन, या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये आज श्री. देसाई यांनी श्री. सिंधिया यांची भेट घेतली. औरंगाबाद  विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करणे, विमानाच्या  फेऱ्या वाढविणे आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या बाबतचे निवेदनेही श्री. देसाई यांनी दिले. यावेळी  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते.

विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार व्हावा - यावेळी झालेल्या चर्चेत श्री. देसाई यांनी सांगितले की, मराठवाडयात अजिंठा -वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना जपान, कोरिया,अमेरिका आदि देशांतून व  वेगवेगळया राज्यांतून तसेच महाराष्ट्रातून मोठया संख्येने पर्यटक भेटी देतात. पर्यटक व प्रवशांचा वाढता ओघ पाहता औरंगाबाद विमानतळाची  सद्याची  धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी अधोरेखित केले. या कामी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल तसेच पुढील  प्रक्रियेसाठी  नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा विषय गतीने पुढे न्यावा व औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावे, अशी विनंतीही श्री. देसाई यांनी केली. राज्यशासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास  विमानतळ धावपट्टीचा विषय तत्परतेने पुढे घेवून जावू,असे आश्वासन यावेळी श्री. सिंधिया यांनी दिले.

विमान फेऱ्या वाढविण्यात याव्यात - पर्यटक व प्रवाशांची वाढती संख्या पाहता औरंगाबाद विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही श्री. देसाई यांनी यावेळी केली. मुख्यत्वे मुंबई-औरंगाबाद शहरांदरम्यान दररोज सकाळी नियमित विमान फेरी सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सद्या उभय शहरांमध्ये सायंकाळी विमान फेरी  सुरु आहे.तथापि,पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची वाढती गर्दी व मागणी पाहता तातडीने सकाळच्या विमान फेऱ्या सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे श्री. देसाई यांनी नमूद केले. याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन श्री. सिंधिया यांनी दिले.

‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ नामकरणास केंद्राने मंजुरी द्यावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी राज्यशासना हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रस्तावास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी श्री. देसाई यांनी यावेळी केली. महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यातून विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव मंत्रालयाकडे आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीने हा विषय मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन श्री. सिंधिया यांनी यावेळी दिले.

औरंगाबाद विमानतळावर ‘छत्रपती संभाजी महाराजां’चा पुर्णाकृती पुतळा उाभारण्याची मागणीही श्री. देसाई यांनी यावेळी केली यास श्री. सिंधिया यांनी सकारात्मकता दर्शविली. श्री. देसाई यांनी श्री. सिंधिया यांना यावेळी, मराठवाडयाची प्रसिध्द शाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एरियल फोटोग्राफीवर आधारित ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी