‘जिरेनिअम’चा नाविन्यपूर्ण योजनेत समावेश; पिकनिहाय लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन
औरंगाबाद| खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा केला जाणार आहे. खते व बियाणांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असली तरी शेतकऱ्यांना खत वापराबाबत प्रशिक्षणातून जागृत करावे. तसेच शेतकऱ्यांना करण्यात येणारा कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. मा मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या उपक्रतंर्गत जिल्ह्यात जिरेनिअम या पिकाची लागवड नाविन्यपूर्ण योजनेत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक फायदा देणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून जन जागृती करावी अशा सुचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कृषी विभागाला दिल्या.
खरीप हंगामातील अपेक्षित पेरणी क्षेत्रासाठी पिकनिहाय लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडून एकूण 49 हजार 71 क्विं. पुरवठा नियोजन करण्यात आले आहे. कापूस 18 लाख 9 हजार 130 पाकीटे, मका 26 हजार 992 क्विंटल बियाण्याच्या पुरवठाचे नियोजन झालेले आहे. सोयाबीन पिकासाठी आवश्यक 25 हजार 350 क्विंटल बियाण्यापेकी शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले 19 हजार 110 व खासगी कंपनी, महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांचे 6 हजार 704 असे एकूण 27 हजार 14 क्विंटल बियाणे जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. खरीप हंगाम 2022 साठी लागणारी बियाणे, खते यांचे नियोजन करण्यात आले असून नियोजनप्रमाणे जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, जिल्हा पणन अधिकारी आर.आर. थोरात, जिल्हा सांख्यिकी अधिकारी सी.ना. साबळे, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन पी.डी.झोड, महाबीजचे एस.आर. मोहकर, विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. सोळकीं, जिल्हा व्यवस्थापक एमआयडीसी दिपक चव्हाण, फळ संशोधन केंद्र हिमायतबागचे प्रकल्प समन्वयक डॉ.एन.डी.पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे प्रतिनिधी आर.आर.शिंदे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी, प्राचार्य कृषी विज्ञान केंद्र, प्रकल्प संचालक, आत्मा यांचे प्रतिनिधी व कृषी विभाग संलग्न असलेल्या सर्व यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खताबाबतची आकडेवारी - खरीप हंगाम 2022 साठी युरिया 1 लाख 3 हजार 280, डिएपी 25 हजार 550, एमोपी 13 हजार 280, संयुक्त खते 98 हजार 480 आणि एसएसपी 34 हजार 980 असे एकूण 2 लाख 75 हजार 480 मे.टन आवटन मंजुर केलेले आहे. जिल्ह्यात खतांची आवक सुरु झालेली आहे. दि.28 एप्रिल 2022 पर्यंत 27 हजार 219 में.टन खत पुरवठा झालेला असुन मागील शिल्लक साठा 80 हजार 886 मे.टन सह एकूण 1 लाख 8105 में.टन खतांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2022-23 मध्ये 6.85 लक्ष हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून कापूस पिकाखाली 3.62 लक्ष हे मका पिकाखाली 1.80 लक्ष हे.तुर पिकाखाली 0.51 लक्ष हे व सोयाबीन पिकाखाली 0.34 लक्ष हे. पेरणी अपेक्षित असल्याचे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. मोटे यांनी सांगितले.