नांदेड| शिक्षण हे भारतीयांच्या सर्वांगिण विकासाचे महाद्वार आहे. तसेच मतदानाच्या अधिकारामुळे या देशात लोकशाही टिकून आहे. संविधानात शिक्षण आणि मतदानाच्या मूलभूत अधिकारांचा अंतर्भाव केल्यामुळे तमाम भारतीयांचा उद्धार झाला असल्याचे मत येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी व्यक्त केले.
ते रेल्वे काॅलनीस्थित डीआरएम कार्यालय परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भिक्खू संघ, अॅड. डीआरएम नागभूषण, वरिष्ठ डीपीओ शंकर चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंय्याबोधी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली इथल्या तमाम हक्क वंचितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यामुळे अस्पृश्यांचे कल्याण झाले.
त्याआधी भारतीय संविधानातून शिक्षण आणि मतदानाचा अधिकार दिला. आपल्याला जन्म देणाऱ्या आईच्या दुधाची जेवढी किंमत आहे तेवढीच मतदानाची आहे. त्यामुळे आपण आपल्या अमूल्य मतांची विक्री करु नये. हा शहाणपणा शिक्षणाने येतो. शिक्षणाकडे दुर्लक्ष करु नये. शिक्षणामुळे अधिकारी बनता येते आणि लोकशाहीत सर्व सामान्यांना शासकही बनता येते. या दोघांनाही चारित्र्य जपण्यासाठी शिलाची आवश्यकता असते. खोटे न बोलणे, हिंसा, चोरी, मद्यपान व व्याभिचार न करणे या पंचशिलेचे पालन बौद्धांसह सर्व भारतीयांनी करावे असेही ते म्हणाले.