नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील मुख्य इमारतीच्या परिसरामध्ये दिनांक 19 मे 2022 रोजी सायंकाळी चार तीस वाजता सिटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या विद्यापीठ युनिटची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस नांदेड जिल्हा मजदूर युनियन चे संस्थापक अध्यक्ष कॉ.विजय गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील पाच वर्षापासून नांदेड विद्यापीठांमध्ये सिटू संलग्न मजदूर युनियन ची शाखा कार्यान्वित आहे. सिटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड हे मजदूर युनियनचे काम पाहतात.
अत्यंत संघर्षमय लढा देऊन सिटू कामगार संघटनेने नांदेड विद्यापीठातील सफाई कामगारांना गेलेले काम मिळवून दिले आहे. त्यासाठी सिटूच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय व नांदेड विद्यापीठा पूढे अनेक आंदोलने केल्याची नोंद आहे. शेवटी संघटनेचा विजय झाला व संघटनेच्या सर्व अडतीस सफाई कामगारांना विद्यापीठामध्ये गेलेले काम पूर्ववत मिळाले आहे.
संघटनेने केलेल्या सर्व निवेदनातील मागण्या ह्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी स्वतः लक्ष घालून तपासल्या व त्यातील सत्यता पडताळून युनियनला सहकार्य केले तसेच सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी त्याचा फायदा झाला. नांदेड दक्षिणचे विद्यमान आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी देखील दिलेल्या निवेदनाची दखल घेत युनियनला सहकार्य केले आहे.
झालेल्या उपरोक्त बैठकीत नूतनीकरण, कामगारांच्या जबाबदाऱ्या व पुढील आव्हानांचा सामना कसा करावा या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कॉम्रेड विजय गाभणे व कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.