इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल - धनंजय मुंडे -NNL

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शिक्षणमंत्री  प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली स्मारक कामाची पाहणी


मुंबई|
दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करीत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून,  मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड,सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिध्द वास्तुविशारद शशी प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर पंधरा दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्च‍ितीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. स्मारक उभारणीचे काम जरी एम. एम. आर. डी. ए. कडे असले तरी राज्य शासनाने इंदूमिल स्मारक उभारणीच्या संनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तत्काळ एम. एम. आर. डी. ए. ला वितरित करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.

यावेळी आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासन यांनी या परिसरात करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे सादरीकरण तसेच प्रत्यक्ष भेट देवून माहिती सांगितली. प्रवेशद्वार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली. एमआरडीए हे सर्व काम गतीने करत असून उर्वरित काम गतीने करणार असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सचिव सुमंत भांगे, एस.व्ही.आर.श्रीनिवासन, डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू, दिनेश डिंगळे यांनी इंदूमिल येथील स्मारक उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली तसेच चालू कामाचा समग्र आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

मंत्रिमंडळाने मंत्री श्री.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचे सनियंत्रण व जलदगतीने पूर्ण करणे यासाठी  एक उपसमिती नेमली असून, या उपसमितीमध्ये श्री. मुंडे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे.या स्मारकाचे काम जलदतीने पूर्ण व्हावे यासाठी दर पंधरा दिवसांनी या कामाचा आढावा घेणार असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी