जय भारत माता सेवा समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती उत्सवाचे आयोजन -NNL


नांदेड|
जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्यावतीने सर्वधर्म समभाव या तत्त्वाने विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अहिंसा परमोधर्मचा संदेश देणारे तीर्थंकार भगवान महावीर यांच्या जयंती अनुषंगाने १४ एप्रिल २०२२ रोजी नवी दिल्ली येथे भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील सामाजिक दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करुन देश विकासासाठी अनेक समाज सुधारकांनी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. त्याकरीता त्यांनी आपल्या भौतिक सुखाची पर्वा न करता अखंड परिश्रम आणि निःस्वार्थ भावनेने आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत भारत देशाची आणि समाजाची सेवा केली आहे. प.पू. सद्गुरु श्री हवा मल्लीनाथ महाराजांच्या दिव्य मार्गदर्शनात जय भारत माता सेवा समितीच्या वतीने अशा महान समाज सुधारकांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात येतात. 

त्याचाच एक भाग म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रखर देशभक्त, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२२ रोजी जयंतीनिमित्त हवा मल्लीनाथ महाराज व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तालकटोरा, इनडोअर स्टेडियम नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात श्री श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज सेवाभावी संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्काराने देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास देशभरातील जय भारत माता सेवा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी