नांदेड| जेतवन नगर तरोडा बु. नांदेड येथील जेतवन बुद्ध विहारात प्रजासत्ताक भारताचे तत्त्वज्ञ प्रजासत्ताक भारताच्या संविधानाचे निर्माते, विश्वरत्न, विश्वभूषण, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती दि. १४ एप्रिल २०२२ रोजी नवयुवक भीम जयंती मंडळ जेतवन नगर यांच्यावतीने नवयुवक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सुमित इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक प्रतिनिधी संतोष मुळे व प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्रा. डॉ. राजपाल चिखलीकर, डॉ. प्रवीणकुमार पाईकराव, जेतवन नगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन डॉ. अतुल चंद्रमोरे व नियोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या वतीने तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांच्या पुष्पाने धुपाने दिपाने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण आयु. प्रा. डॉ. राजपाल चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले तर सूत्त पठन व्हि.पी. वाघमारे यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक प्रतिनिधी संतोष मुळे यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रमोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक तथा वक्ते आयु. प्रा. डॉ. राजपाल चिखलीकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेबांची जयंती ही नाचून नव्हे तर वाचून साजरी केली पाहिजे असा मोलाचा सल्ला प्रस्ताविक व वक्ते यांनी दिला. दरवर्षी जयंती चे आकडे वाढत असतात परंतु आपण जिथल्या तिथेच राहतो तेंव्हा आज १३१ वी जयंती आहे.
पुढे १३२ वी जयंती येईल तेंव्हा एका वर्षामध्ये आपण आपल्या स्वतः मध्ये काय बदल घडवून आणला यासाठी आपण दरवर्षी एक संकल्प केला पाहिजे असा मोलाचा सल्ला प्रमुख वक्ते डॉ. चिखलीकर यांनी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन पुण्यवर्धन वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास नगरातील व परिसरातील उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी नवयुवक भीम जयंती मंडळाचे प्रोत्साहनपर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंतर नवयुवक भीम जयंती मंडळाच्या वतीने सर्व उपस्थितांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.