जयश्रीरामच्या नामघोषात वाढोण्यात निघाली शोभायात्रा; राममंदिरात रामनवमी साजरी -NNL

बजरंग दल - विश्वहिंदू परिषदेच्या पुढाकारातून रामजन्मोत्सव सोहळा थाटात साजरा    


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील श्रीराम मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, श्रीसाई मंदिर, श्री परमेश्वर मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच देवी देवतांच्या मंदिरात चैत्र शुद्ध अष्टमीच्या दि.१० एपरील रोज रविवारी मर्यादापुरुषोत्तम अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने येथील बजरंग दल - विश्व् हिंदू परिषद शाखेच्या युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीराम... जय...जय...श्रीराम च्या नामघोषात, भारूढ भजनी मंडळ आणि डीजेच्या तालावर सायंकाळी ५ वाजता भव्य शोभा यात्रा काढली. यामुळे वाढोणा शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. 



पौराणिक कथेनुसार श्री रामनवमीच्या दिनी त्रेतायुगात महाराज दशरथांच्या घरी विष्णूचा अवतार असलेल्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला होता. रावणाचा अंत करण्यासाठी रामाचा जन्म झाला, त्यामुळे आजही सुशासन, मर्यादा, सदाचारी म्हणून प्रभू श्रीरामचंद्राला पूजिले जाते. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरासह तालुकाभरात मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीराम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच देवी - देवतांच्या मंदिरात राम नामाचा जप करीत प्रभू श्री रामचंद्राच्या जीवन चरित्रावर आधारित भक्तीगीते महिला - पुरुष भजनी मंडळीनी सादर केली. 


बजरंग दलाच्या युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीराम... जय .. जय... श्रीराम.... प्रभू श्री रामचंद्र कि जय.. सियावर रामचंद्र कि जय.. जय श्रीराम नावाचा जयघोष करीत भव्य शोभा यात्रा काढली होती. यावेळी डोक्यावर भगवे फेटे, हाती प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा असलेले भगवे झंडे घेऊन शेकडो युवक शोभा यात्रेत सहभागी झाले होते. सुरुवातीला श्री परमेश्वर मंदिरात नायब तहसीलदार अनिल तामस्कर, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, श्याम रायेवार, प्रवीण जन्नावार, सुधीर उत्तरवार, कमलाकर दिक्कतवार, बाळूआणा चवरे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते वाढोणा येथील हिदायत खान फुलवले यांनी तयार केलेला भव्य पुष्पहार प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी संतोष गाजेवार, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, बजरंग दल संयोजक गजानन चायल, प्रकाश रामदिनवार, विठ्ठल ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, रामभाऊ सूर्यवंशी, विपुल दंडेवाड, सुधाकर चीटेवार, सावन डाके, राम नरवाडे, उदय देशपांडे, मुन्ना मारुडवार, श्रीनिवास चीद्रावार, गजानन हरडपकर, दिनेश राठोड, मोहन ठाकरे यांच्यासह अनेकांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. 


त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने श्रीरामचंद्राच्या प्रतिमा असलेली भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. रैलीच्या सुरुवातीला ढोल तशा, त्यामागे घोड्यावर स्वर भागवाधारी युवक, त्यानंतर सिबदरा, पळसपूर येथिल भारूड भजनी मंडळ त्यामागे, प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तीगीते असलेले डीजे व प्रभू श्रीरामाची प्रतिमा अश्या शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. दरम्यान रैलीत सामील झालेल्या रामभक्त युवकांसाठी महात्मा फुले चौक, सराफा लाईन, बजरंग चौक, कालिंका गल्ली, गणेश चौक, श्रीराम मंदिराजवळ थंड पेयजल व्यवस्था करण्यात आली होती. तसेच बाजार लाईनमध्ये भाजपतर्फे लस्सी आणि आमरस तर शहरातील प्रसिद्ध वर्धमान मेन्स वेयरचे मालक आशिष जैन यांचेतर्फे मठ्ठयाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील चौकाचौकात अनेक नागरिक, व्यापाऱ्यांनी श्रीरामचंद्राच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. ठिक ठिकाणच्या नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीत तर काहींनी पुष्पवृष्टी करून केले. त्यानंतर शोभा यात्रा बाजार लाईनीतून थेट गणेश चौक, श्रीराम मंदिराच्या मार्गाने श्री परमेश्वर मंदिरात परत आल्यानंतर समारोप करण्यात आला. 


शहरातील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. यावेळी आरती - पूजा करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शहरातील सधन शेतकरी भय्या बंडेवार यांच्या फार्महाउस वरील श्री साई मंदिरात विविध कार्यक्रमाने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो महिला, पुरुष भक्तांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित शेकडो महिला - पुरुषांनी श्रीसाई व प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरती करून दर्शन घेतले. तसेच तालुक्यातील बोरगडी येथील हनुमान मंदिरात, सरसम येथील श्री कृष्ण मंदिरात, इंदिरा नगर साईबाबा मंदिरात, करंजी येथील महादेव मंदिरात, विरसनी येथील दत्त मंदिरात, वडगावला भैरवनाथ मंदिरात, पार्डीला साईबाबा मंदिरात, आणि सोनारी, पोटा, पारवा, कांडली, कार्ला, मंगरूळ, टेंभी, सिरंजणी, पळसपूर, कामारी, खैरगांव - कामारवाडी, सातशिव हनुमान मंदिरात, जवळगाव, खडकी, एकघरी, वाशी, चिचोंडी, सवना, वडगांव, आंदेगाव, आदीसह सर्वच गावातील मंदिरामध्ये भजन - कीर्तन अश्या भक्ती संगमात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. गट दोन वर्षपापासून कोरोना काळामुळे रामजन्मोत्सव साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदाच्या रामनावीमी उत्सवात भाविकांचा आनंद द्विगुणित झाला होता. आजच्या रामजन्मोत्सव सोहळ्यात महिलांची अतुलनीय उपस्थिती दिसून आली. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक भगवान कांबळे  यांनी चॊख पोलीस बंदोबस्त लावून शांततेत रामनवमी साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी