नांदेड| महा आवास अभियानांतर्गत सन 2020-21 या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. दिनांक 22 एप्रिल रोजी ग्राम विकास मंत्रालयाने या पुरस्काराची घोषणा केली आहे.
मुंबई येथे एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांना पुरस्कार स्विकारण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सन 2020-21 या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यात महा आवास अभियान राबविण्यात आले होते.
या अभियानात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्हा व तालुकास्तरावर बैठका घेवून तसेच प्रत्यक्ष गावस्तरावर कामांची पाहणी करुन घरकुल पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. या अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमात घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजूरी देणे या उपक्रमात नांदेड जिल्हा परिषदेला व्दितीय क्रमांक मिळाला आहे. मुलभूत नागरी सुविधा देवून आदर्श घरांची निर्मिती उपक्रमात तृतीय तर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे कर्ज मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेला व्दितीय पुरस्कार मिळाला आहे. आवास योजनेतील नांदेड जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
जिल्हयातील ग्रामीण भागात आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत नांदेड जिल्हयातील ग्रामीण भागातून प्रधानमंत्री आवास योजनेत 21 हजार 594, रमाई आवास- 6 हजार 34, शबरी आवास- 710, पारधी आवास- 45 तर आदिम कोलाम आवास योजनेत 62 असे एकूण 28 हजार 442 घरकुलांचे बांधण्यात करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले होते. घरकुल कामात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचा सहभाग व सहकार्याने आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळेच नांदेड जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळू शकले, अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.