खासदार हेमंत पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली भेट
हिंगोली/नांदेड/यवतमाळ| हळद या नगदी पिकाचा पिकविम्याच्या यादीत समावेश करावा , हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित पीकविमा वाटप करावा,आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, राज्यमंत्री कैलास चौधरी आणि राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे केली आहे व याबाबत निवेदनही दिले. यावेळी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे. कृषी सचिव एकनाथ डवले , खासदार हेमंत गोडसे, खासदार राजेंद्र गावित, खासदार रक्षा खडसे यांच्यासह आदी उपस्थित होते .
हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या अनुषंगाने राज्यशासनाने हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास धोरण समितीची स्थापना खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करून हिंगोली जिल्ह्यात हिंदूह्रयद्यसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देऊन त्याकरिता १०० कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या माध्यमातून हळदीचे उत्पादन आहे. त्यापेक्षा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीचे संकरित बियाणे उपलब्ध झाले पाहिजे. हळद लागवडीपासून काढणी पर्यंतची प्रक्रिया याबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादर करण्यात आली आहे. हळद पीक घेण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागत असतो तसेच उत्पादन खर्च अमाप आहे. अति पावसामुळे व दुष्काळामुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते.
तसेच वातावरणाच्या बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने काही वेळेस उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत आर्थिक नुकसान सहन करावे लागते म्हणूनच इतर खरीप व रब्बी पिकांसोबत हळद पिकाचा समावेश सुद्धा पीकविमा यादीमध्ये करावा आणि हळदीला पिकविम्याचे संरक्षण देण्यात यावे असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. यासोबतच हिंगोली लोकसभा मतदार संघातील प्रलंबित पीकविमा वाटप करावा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अडचणी दूर कराव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली .