नांदेड/लातूर| राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील पदांची नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी संस्थांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी पात्र नागरी सहकारी फेडरेशन्स कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जास्तीतजास्त ईच्छूकांनी नामतालिका (पॅनेल) सहभाग नोंदविण्याचे आवाहन पुणे येथील उपनिबंधक (नागरी बँका) आनंद कटके यांनी केले आहे.
नामतालिकेवर समावेश होण्यासाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत असावी, सदर संस्थेस किमान 10 वर्षे पूर्ण झालेली असावीत, किमान 25 सहकारी बँकास दर संस्थेच्या सभासद असाव्यात, सदर संस्थेचा ऑडीट वर्ग मागील सलग 3 वर्षे असावा व सदर संस्था मागील सलग 3 वर्षात नफ्यात असावी. नामतालिकेवर समाविष्ट होणाऱ्या एजन्सीसाठी अधिकची पात्रता व लागू अटी शर्तींसाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्थायांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
या नामतालिकेवर (पॅनेलवर) समावेश होण्यासाठी संबंधित संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रासह आपला अर्ज सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, नवीन मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे -411001 यांचे नावे करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.25 एप्रिल,2022 पर्यंत राहील. प्राप्त अर्जाची छाननी दि.5 मे,2022 रोजी पूर्ण करुन अंतिम नामितालिका दि. 11 मे, 2022 रोजी प्रसिध्दी करण्यात येईल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. संबंधितांनी अधिक माहितीसाठी 020-26122846/47 ई-मेल क्र. comm.urban@gmail.com वर संपर्क साधावा.