नांदेड| भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि जागतिक रंगभूमी दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाट्यसप्ताह व अभिनय या कार्यशाळेचे उद्घाटन दि. २१ मार्च रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते अधिसभा सभाग्रहामध्ये पार पडले. यावेळी आंतरविद्याशाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक बच्चेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण हे लाभले. उद्घाटन समारोहाचे प्रस्ताविक संकुलाचे संचालक डॉ. पी.विठ्ठल यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा. राहुल गायकवाड यांनी केले. सकाळच्या सत्रातील बीज भाषणात सोमण यांनी ‘व्यावसायिक अभिनय’ या बाबींवर प्रकाश टाकला. चित्रपट, मालिका, वेब सिरीज, डबिंग अशी विविध माध्यमे जिथे वाचिक, कायिक, स्वभाविक अभिनय केला जातो. त्याचे बीजरोपण हे नाट्य प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, विद्यालये, विद्यापीठे यातूनच होत असते व या संस्थाच्या प्रशिक्षण प्रणालीमध्ये नाट्यप्रशिक्षण हे व्यवसायाभिमुख झाली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. योगेश सोमण यांनी केले.
कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात सोमण यांनी अभिनयासाठी लागणारे विविध व्यायाम, त्या संबंधित अभ्यास प्रात्यक्षिकासह करून दाखविला. या कार्यशाळेसाठी संकुलातील डॉ. अनुराधा जोशी, प्रा. रतन सोमवारे, डॉ. शिवराज शिंदे, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. किरण सावंत, प्रा. रमाकांत जोशी, ज्ञानेश्वर पुयड, प्रकाश रगडे, अजिज खान पठाण यांच्यासमवेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.