नांदेड। ज्या आई-वडिलांनी आणि जन्मभूमी ने तुमच्यावर संस्कार केलेत त्या मातृभूमीला आणि मातृत्वाला विसरू नका तेच तुमच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत असे व्याख्याते प्रबोधनकार उध्दव बापु फड यांनी आवाहन केले.
टाकळगाव ता.लोहा जिल्हा नांदेड येथील स्वर्गीय सरस्वतीमाई लामदाडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत गावाकडे तुझं गावच नाही का तीर्थ या विषयावर उध्दव बापु फड बोलत होते.विचारपीठावर लोहा पंचायत समिती सभापती आनंदराव पाटील शिंदे उपसभापती लक्ष्मणराव बोडके ,माजी सभापती शंकरराव ढगे, सरपंच भिमराव पाटील लामदाडे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव मोरे,उपसरपंच संभाजी चिंतोरे ,ग्रामविकास अधिकारी अशोक लामदाडे, प्रा व्यंकट बदणे आर.जी. गायकवाड,अरविंद जगताप आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उद्धव बापु फड म्हणाले की महात्मा गांधी म्हणाले होते की खरा भारत हा खेड्यात आहे खेडी सुधारली तर देश सुधारेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भारतात बंधुभाव नित्य वसु दे दे वरचि असा दे असा संदेश देत कलियुगातही राम राज्य याव आणि सर्वांना सुख समाधान मिळावं हा त्यांचा मूळ उद्देश होता.तुझं गावच नाही का तीर्थ तू कशाला फिरतो व्यर्थ असे सांगीतले.
आपल्या महाराष्ट्राला संत सांप्रदायाची परंपरा असून इथल्या प्रत्येक संताला समाजसुधारकाला खेड्यापाड्यातला माणूस सुधारावा म्हणून ते भजन प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन करायचे परंतु आजची तरुण पिढी शिकली-सवरलेली गाव सोडून शहराकडे वळली माणूस गाव सोडून शहराकडे गेला की तो परत गावाकडे वळूनही पाहत नाही.
गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून कार्य केले तर गाव सुधारायला वेळ लागणार नाही.आपलेही गाव हिवरे बाजार राळेगण-सिद्धी होऊ शकते.गावातील माणसांचे रक्त संबंधाचे नाते जपायला हवेत.आपण कितीही मोठे झालो किती श्रीमंत झालो तरी जन्मदात्या आईला आणि जन्मभूमी ला कधी विसरू नका तिचे आपल्यावर अनगिनत उपकार असून ती स्वर्गापेक्षा हि सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या पिढीने गाडगे महाराज यांनी जे काम गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. त्यांचे उपदेशही साधे व सोपे असत.
चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी सांगत असत. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.हा विचार आत्मसात केला पाहिजे. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी अशोक लामदाडे,रामदास लामदाडे यांनी प्रयत्न केले.