श्रीराम वन गमन पथ काव्य रथ यात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्याची संपूर्ण तयारी -NNL


नांदेड|
श्रीराम वन गमन पथ काव्य रथ यात्रेचे 15 मार्च रोजी नांदेड येथे आगमन होणार असून, यात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्याची संपूर्ण तयारी झाल्यामुळे राम भक्तांनी दुपारी एक वाजता शोभायात्रेत व सायंकाळी सहा वाजता कविसंमेलनात भगवे कपडे घालून हजारोच्या संख्येत उपस्थित राहून चरण पादुकांचे दर्शन घ्यावे. असे आवाहन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, शशिकांत पाटील, गणेशसिंह ठाकूर, गणेश कोकुलवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

श्रीराम जन्मोत्सव समिती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीराज चक्रवार, महेश देबडवार, सागर जोशी, सोनू उपाध्याय व चेतन पंडित हे उपस्थित होते. राष्ट्रीय कवि संगम नांदेडचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी यात्रा काढण्यामागची भूमिका स्पष्ट करताना असे सांगितले की,प्रभू रामचंद्र हे चौदा वर्ष वनवासात होते. त्यावेळी ते ज्या मार्गाने गेले होते. त्या मार्गात त्यांना अनेकांनी मदत केली. 

परतीच्या प्रवासात त्या सर्वांना भेट देण्याचे वचन रामांनी दिले होते. परंतु वनवास संपण्यास फक्त एक दिवस आधी रावणाचा वध झाला. भरताने राज्यकारभार चालवताना अशी अट टाकली होती की, 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जर प्रभू रामचंद्र परत आले नाही तर दुसऱ्या दिवशी प्राणत्याग करेल. भरताचे प्राण महत्त्वाचे असल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी श्रीलंका ते आयोध्या असा पुष्पक विमानातून प्रवास केला. वनवासातील मदत केलेल्या सर्वांना परत भेटण्याचे वचन प्रभू राम  पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ज्या ज्या भागात प्रभू रामचंद्र गेले होते त्या त्या भागातून ही रथयात्रा जाऊन रामाचे वचन पूर्ण करणार आहे. 

विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री शशिकांत पाटील यांनी असे सांगितले की,महाशिवरात्रीला श्रीलंकेतील अशोक वाटीका येथून ही यात्रा सुरू झाली आहे. ६५०० किमी अंतर पूर्ण करून रामनवमीला अयोध्या  येथे  जाणार आहे. रथयात्रेमध्ये चरण पादुका असून त्या योगीजींच्या हस्ते अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. श्रीराम जन्मोत्सव समिती चे गणेशसिंह ठाकूर यांनी माहिती दिली की,यात्रा यशस्वी करण्यासाठी हजारो राम भक्त एका महिन्यापासून परिश्रम घेत असून नांदेड शहर भगवीकरण येत आहे. 

गणेश कोकुलवार यांनी माहिती देताना सांगितले की,मंगळवार दिनांक 15 मार्चला दुपारी 1 वाजता रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून अतिभव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेमध्ये ढोल पथक, भजनी मंडळ, विविध देखावे, घोडे, अठरा फूट उंचीची राम मूर्ती, चरण पादुका रथ राहणार आहे. श्रीराज चक्रवार यांनी रामायण वेशभूषा स्पर्धेची माहिती दिली.रामकथेतील  पात्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या आठ ते पंधरा वर्षे वयातील मुला-मुलींच्या बसण्यासाठी छत असलेली एक ट्रॉली  राहणार आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

महेश देबडवार यांनी शोभायात्रेचा मार्ग सांगितला. शोभायात्रा दुपारी एक वाजता रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून प्रारंभ झाल्यानंतर जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हनुमान पेठ,  मुथा चौक, शिवतीर्थ, गांधी पुतळा ,चिखलवाडी कॉर्नर, पंचवटी हनुमान मंदिर मार्गे मल्टीपर्पज हायस्कूल पर्यंत सायंकाळी पाच वाजता शोभायात्रेचा समारोप होणार आहे. 

यावेळी सर्व राम भक्तांकरिता मसाला खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे.मल्टीपर्पज हायस्कूलच्या भव्य मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत देशातील नामवंत कवींचे वीर रस व हास्य रसाचे अखिल भारतीय कविसंमेलन होणार आहे. या कविसंमेलनात नांदेड जिल्ह्यातील २१ संत महंतांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच हिंदू धर्मात असलेल्या सर्व जातीच्या जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात येणार आहे. बहुतेक सर्व जातींच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठविण्यात आले आहे.जर कोणाला मिळाले नसतील तर त्यांनी समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन चेतन पंडीत यांनी केले आहे. सूत्रसंचलन सागर जोशी यांनी तर  सोनू उपाध्याय यांनी आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी