स्त्री-पुरुष समानतेसाठीची मॅरेथॉन स्पर्धा भविष्यात चळवळ बनेल – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत -NNL


नागपूर|
स्त्री-पुरुष समानतेची भावना समाजात रुजविण्यासाठी नागपूर शहरात महिलांसाठी आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा भविष्यात समानतेची चळवळ होईल,असा विश्वास नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज व्यक्त केला. समाजात महिलांविषयी असलेली भेदभावाची भावना दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने नागपूर शहरात "ब्रेक द बायस" अर्थात "महिलांविषयी भेदभाव सोडा" या आशयावर खास शालेय विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संविधान चौकातून सुरू झालेल्या 5 किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क मैदानावर पार पडला. या स्पर्धेत सुमारे 30 हजार विद्यार्थिनी आणि माता भगिनींनी सहभाग घेतला. त्यावेळी पालकमंत्री डॉ. राऊत बोलत होते. पशू संवर्धन, दुग्ध विकास व क्रीडा मंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, खासदार विकास महात्मे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, क्रीडा संचालक शरद सुर्यवंशी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ असो की, राजकारण, समाजकारण महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. नागपूर जिल्हा व विभागीय प्रशासनाची सूत्रे महिला शक्तीच्याच हातात आहे. या महिला अधिकार्‍यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच स्त्री शक्तीच्या अफाट स्वरूपाचे दर्शन आज घडले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या मुली आणि महिला केवळ पुरस्कारासाठी धावल्या नाहीत तर "लडकी हूं लड सकती हूं " हा संदेश जगाला देण्यासाठी धावल्या आहेत. मुलगा-मुलगी, गरीब-श्रीमंत हा विषमतेचा भेद सोडून या महिलांनी एकप्रकारे  "झुंड" दाखविली. स्त्रियांना कमी लेखणारे आणि त्यांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांसाठी ही झुंड असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचा मंत्री, नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री, एका मुलीचा पिता आणि एका नातीचा आजोबा म्हणून ही स्त्री शक्ती बघताना मला खूप अभिमान वाटत आहे.

महिला व बाल कल्याणासाठी महाविकास आघाडी सरकारने नवे धोरण जाहीर केले आहे. नागपूर जिल्ह्यात अंगणवाडी बांधकाम, दुरूस्ती आणि स्वच्छतागृह बांधकामासाठी दोन वर्षांत 17 कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रियदर्शिनी महिला संस्था आणि करुणा महिला संरक्षणगृहाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. कोरोना काळात 200 एम्बूलेन्सेसच्या माध्यमातून जनतेला वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांनी महिलांच्या कल्याणासाठी धोरण राबविले असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला शक्तीमुळेच भारत देशाची प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन पशू संवर्धन, दुग्ध विकास व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केले. स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांची अतिशय मुक्त कंठाने प्रशंसा केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी