नांदेड| सावित्रीबाई फुले आणि ताराबाई शिंदे यांचा समतेचा वारसा पुढे न्यायला हवा. त्यासाठी भूमिका घेऊन लेखन करावे. स्त्रियांना गुलाम करणाऱ्या व्यवस्थेला शरण न जाता व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांना छेदणारे हवे , असे प्रतिपादन मराठी साहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. शारदा कदम यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रात अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. सत्राचा विषय ‘मराठी साहित्यातील स्त्रियांचे योगदान: मी व माझे लेखन’ हा होता. यावेळी मंचावर स्नेहलता स्वामी, अर्चना डावरे, ज्योती कदम, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. वैजयंता पाटील व भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर उपस्थित होत्या.
स्नेहलता स्वामी यांनी प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करतांना कवितेने मला खूप सोबत केली. कवितेने आत्मविश्वास दिला, असे सांगून शेतकऱ्याच्या जीवनावर लिहिलेल्या कथेने शेतकऱ्याला प्रत्यक्षात न्याय मिळाला. हे साहित्याचे यश आहे. पण बाई म्हणून समाजात वावरताना अनेकदा दुय्यम वागणूक मिळाली, तथापि त्यावर मात करण्याचे बळ लेखनाने दिले, असे त्यांनी सांगितले. ज्योती कदम यांनी पोलीस प्रशासनात कौटुंबिक कलह मिटवितांना भाषा व साहित्याचा कसा उपयोग झाला हे सांगितले. नवनिर्मितीचा ध्यास असणारे हात अधिक देखणे असतात. साहित्य स्त्रीने लिहिले म्हणून त्याकडे कौतुकाने किंवा हेटाळणीने पाहू नका तर त्याकडे निखळ साहित्य म्हणून पाहावे.
अर्चना डावरे यांनी सृजनाचे समाधान खूप मोठे असते. आपल्या भावविश्वाला साहित्य संस्काराची साथ मिळाली कि लेखन उत्तम होते. शिक्षकांनी आणि पुस्तकांनी लिहिण्याची प्रेरणा दिली. जीवनातील वैविध्यपूर्ण अनुभवांना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या वाङमय प्रकारात मी लेखन केले, असे त्या म्हणाल्या. सत्राचे सूत्रसंचालन पवन वडजे व आभार प्रदर्शन प्रज्ञा टोम्पे यांनी केले. यावेळी डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. रमेश ढगे, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. अनुराधा पत्की, डॉ. दुर्गेश रवंदे व विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.