अर्धापूर नजीक रस्ता सपाटीकरण करणाऱ्या वाहनाने शेतकऱ्यास चिरडल्याने जागीच मृत्यू -NNL

ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा आणखी एक ठरला बळी 


नांदेड/अर्धापूर|
नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील  दाभड येथे सुरु आहे. एक शेतकरी आपल्या दुचाकीवर काम आटपून घराकडे परत जात होता. याचवेळी सत्यगणपती मंदिरा समोर सपाटीकरणाचे काम वाहनाद्वारे रात्रीला सुरू होते. दरम्यान या वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्यास चिरडल्यामुळे सदर शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गजानन श्रीराम पावडे वय-३५ असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

नांदेड नागपूर-राष्ट्रीयमहामार्ग क्र.३६१ चे काम सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी रस्ता सपाटीकरण करण्याचे काम रात्रीला केले जात आहे. याचा काळात तालुक्यातील दाभड येथील युवा शेतकरी गजानन श्रीराम पावडे वय-३५ वर्ष यांचे शेतात हळद काढणी व शिजवणीचे काम सुरू होते. बुधवारी रात्री उशिरा शेतातून घराकडे परत जात असताना सत्यगणपती मंदिरासमोर त्यांना सपाटीकरण करणाऱ्या वाहनाने चिरडले. हा प्रकार लक्षात येताच तात्काळ महामार्ग पोलिसांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. 

पण उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. दाभड ता.अर्धापूर येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, उपनिरीक्षक कपिल आगलावे, महामार्गचे प्रभारी शंकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर तिडके,  सुमित बनसोडे, प्रभाकर करडेवाड यांनी उपस्थित होऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम सुरू असताना  ठेकेदाराकडून वाहतुकीच्या नियमासंदर्भात कुठल्याही प्रकारचे सूचना फलक किंवा काळजी घेतल्या जात नाही. त्यामुळे यापूर्वी अपघात होऊन या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले आहेत. याबाबत प्रशासन मात्र कुठलीच दखल घेत नाही, किंवा कार्यवाही करत नाही. कधीही त्या गुत्तेदार किंवा कंपनीची चूक दाखविल्या जात नाही. उलट मृत झालेल्याच्या नातेवाईकानाच समज देण्यात येते. रस्त्याच्या काही कामाच्या बाबतीत संध्याकाळची परवानगी असेलही, पण सपाटीकरण करणाऱ्या वाहनाला रात्रीची परवानगी असते का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. 

उलट सदरील कामाच्या ठिकाणी केवळ एकच चालक होता. तिथे सूचना देण्यासाठी कुठलाही व्यक्ती किंवा फलक नव्हता. काम उरकण्याची घाई-गडबड, कमी मनुष्यबळ आणि कंपनीचे पैसे वाचविण्याच्या काटकसरीत निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. या अपघातात पूर्णतः संबंधित वाहन चालकाची तर चूक आहेच त्यासोबत यास संबंधित ठेकेदारचे व्यवस्थापकही तितकाच जबाबदार आहे. असा आरोप करत गावकरी ठेकेदाराच्या हलगरीपणा बाबत संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता याबाबत संबंधित कंत्राटदार, व्यवस्थापक व चालकावर गुन्हा दाखल करावा आणि शेतकऱ्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकातून होत आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी