विद्यार्थी शाळेत टिकून कसे राहतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी - अशोकराव चव्हाण -NNL


नांदेड|
ग्रामीण भागात पालकांच्या अनेक समस्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी शाळेत टिकून कसे राहतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. शाळांना इमारती, गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार व जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार वितरणाचा सोहळा आज रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी नांदेड येथील कुसुम सभागृह येथे संपन्न झाला.

जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर जयश्री पावडे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी राज्यमंत्री व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार अविनाश घाटे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाज कल्याण सभापती रामराव नाईक,  महिला व बाल विकास समितीच्या सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले आदींची मंचावर उपस्थिती होती. 

जिल्ह्यात वाचन चळवळ रुजावी यासाठी मराठी भाषा दिनाच्या औचित्याने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची ग्रंथतुला करण्यात आली. येथील ग्रंथ आणि इतर दानातून मिळालेली पुस्तके यांचे वाटप मराठी शाळांना करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती दिली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून इंग्रजी शाळांच्या धर्तीवर मराठीच्या जिल्हा परिषद शाळा विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षणातूनच माणसाचा सर्वांगीण विकास होतो, त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी नवी संधी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आई-वडील हेच सगळ्यांचे प्राथमिक शिक्षक असतात त्यामुळे पालकांनी मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नांदेड जिल्ह्याला वैभवशाली सांस्कृतिक, सामाजिक परंपरा असून या परंपरेत अनेक लेखक, साहित्यिक आपापल्या क्षेत्रात गुणात्मक काम करीत आहेत. याबद्दल नरहर कुरुंदकर पुरस्कार प्राप्त लेखक देवीदास फुलारी आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त डॉ. भारती मढवई यांचे त्यांनी कौतुक केले. मराठी साहित्य गोदावरीच्या खोऱ्यात निर्माण झाले आहे. या ठिकाणी नरहर कुरुंदकरांसारखा सर्जनशील लेखक तयार झाला ही अभिमानास्पद बाब आहे.

सद्यस्थितीत भाषा मरत आहे ही अत्यंत चिंतेची बाब असून भाषा मेली तर मोठे सांस्कृतिक नुकसान होणार आहे, असे मत देवीदास फुलारी यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षण क्रांतिकारकांच्या नावाने मला दिला जाणारा पुरस्कार पुढील कार्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे डॉ. भारती मढवई म्हणाल्या. या कार्यक्रमात नरहर कुरुंदकर पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यासह ६९ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उप शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती यांची सहाय्यक शिक्षण संचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या स्थळी विविध शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले होते. मेंदूची व्यायाम शाळा आणि मिलिंद जाधव यांच्या चित्रप्रदर्शनीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमात अविनाश भुताळे आणि त्यांच्या संचांनी स्वागत गीत गायले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेने तयार केलेल्या देशभक्तीपर समूह गायनाच्या सीडीचे अनावरण पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी लता मंगेशकर आणि सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व व्यंकटेश चौधरी तर उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी मानले. आनंदी विकास यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, बबन बारसे आनंदराव गुंडले, जिल्हा परिषद सदस्य मीनल खतगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे जिल्हा, परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक, पत्रकार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, उप शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती,  लेखाधिकारी योगेश परळीकर, बिरकुले, गोटमवाड, दीपक महालिंगे, संजय भालके, उदय हंबर्डे, निशांत पळणाटे, संतोष देशमुख, गजानन सूरकूटवार, राजेश कुलकर्णी, उद्धव मुळे, संजीव मानकर, भास्कर भरकडे, दिनेश नेहुलकर, गणेश शिंदे, अब्दुल कलीम, आबाराव पवार, किशोर खिल्लारे, प्रलोभ कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी