दिनांक 15 ऑक्टोंबर. जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षाची थिम आहे- आपले भविष्य आपल्या हातात. यानिमित्त स्वच्छतेवर प्रकाश टाकणारा मिलिंद व्यवहारे यांचा लेख प्रकाशित करत आहोत.
संयुक्त राष्ट्र संघाने आरोग्य अबाधित राहावे यासाठी आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस 15 ऑक्टोबर हा दिवस जगात साजरा करण्यात येतो. स्वच्छता आणि आरोग्यशास्त्र हया गोष्टी लोकांच्या आरोग्यासाठी व विकासासाठी आवश्यक आहेत. दरवर्षी लाखो लोक अस्वच्छतेमुळे मरण पावतात. विशेष करुन मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी समर्पित प्रयत्नांची गरज आहे. विशेषत्वाने साबणाचा वापर करुन हात धुने व स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी शाळेतील मुलांना व त्यामार्फत समाजाला जागरुक करण्यासाठी एका कल्पक राष्ट्रीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
जागतिक हात धुवा दिनाची यावर्षीची थिम आहे, आपले भविष्य आपल्या हातात. ही थिम घेवून वर्षभर देशभरात जनजागृती केली जाणार आहे. आपणां सर्वांना हे माहित आहे की, जिवाणू, विषाणू, परोपजिवी यासारख्या अनेक जिवाणूंपासून अतिसार व इतर रोग होतात. मानवी विष्ठा ही अतिसाराच्या रोग वाहकाचा प्रमुख स्त्रोत आहे. हे रोग वाहक विषमज्वर, कॉलरा, कोरोना, जंतांचा संसर्ग, चिकन गुनीया स्वाईनफ्ल्यू व श्वसन संस्थेशी संबंधित काही रोग यांचाही स्त्रोत आहे. एक ग्रॅम विष्ठेमध्ये एक कोटी विषाणू, दहा लाख जिवाणूं व एक हजार परोपजिवी अंडी व कोष असतात. माशा, हात, द्रवपदार्थांमधून या रोगांचा प्रसार मोठया प्रमाणात पसरतो.
या वर्षाची संकल्पनेनुसार हाताच्या आरोग्यात गुंतवणूक करण्यास संबंधित नीती, कार्यक्रम आखताना होणाऱ्या ऐतिहासिक दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे. राज्यातील विविध पार्टनर्सच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी हातांच्या आरोग्याबाबत जागृतीसाठी महाराष्ट्र युनिसेफने 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मावशी,मामा, काका-काकी, आत्या, ताई-दादा आजी-आजोबा यांना हाताच्या स्वच्छतेबाबत पत्र पाठवण्याची संकल्पना आहे. यात हात धुण्याची सवय आणि आरोग्याच्या संबंधाबद्दल विद्यार्थी आपल्या पाच नातेवाईकांना पत्र पाठवेल. छापील पत्रे उपलब्ध करून दिली जातील.
12 ऑक्टोबर रोजी मोबाईलचा आधार घेऊन समूह संदेश पाठवण्यात येतील. यात हाताच्या आरोग्याबाबत जागृती करणारे, मोबाईलच्या माध्यमाने दररोज एक याप्रमाणे 16 ऑक्टोबर पर्यंत ठराविक वेळेत संदेश पाठविणे, दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पोस्टर निर्मिती व निबंध लेखन स्पर्धा- जागतिक हात धुवा दिनाच्या अनुषंगाने या वर्षीच्या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांसाठी पोस्टर, निबंध लेखन स्पर्धा घेतली जाईल. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी शाळांमध्ये उपलब्ध हातधुण्याची सुविधा असलेले ठिकाण दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी मोहिम घेण्यात येईल. तसचे शाळेत अस्तित्वातील नळांना बदलून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेटेड नळ बसवण्याचा प्रयत्न केला जाईल. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील गावे,वस्ती,वाडया, तांडे येथे स्वयंसेवकांच्या माध्यमातून हात धुण्याचे प्रात्यक्षिक आणि पथनाट्य, लाऊडस्पीकरच्या आधारे प्रचार करणे. तसेच हाताचे आरोग्य राखण्यास संबंधित जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यानच्या काळात सुटया येत असल्यामुळे त्या-त्या जिल्हयाच्या सोईने कार्यक्रम घेण्याची मूभा असेल.
इ.स.1840 मध्ये डॉ.ईगनाज, सेमेलवाईस यांनी हात धुण्याचा महत्वाचा शोध लावला. युरोपमध्ये एका शैक्षणीक इस्पितळात ते डॉक्टर होते. दवाखाण्यात बाळांतपणासाठी येणा-या महिलांचा मोठया प्रमाणात मृत्यू होत होता. एका प्रयोगामध्ये त्यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना व इतर डॉक्टरांना स्त्रीला हात लावण्यापूर्वी स्वच्छ हात धुण्यास सांगितले. केवळ या हात धुण्यामुळे प्रसूती विभागातील मृत्यू जवळ-जवळ 50% नी कमी झाले. अशा रितीने हात धुण्याचा महत्वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्वच्छ ठेवतात त्यांचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या मार्फत घरा-घरात हात धुण्याचा व स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या सवयी शाळेतून लागाव्यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. ते स्वच्छ व वापरात राहण्यासाठी शाळेसह गावक-यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हात धुण्यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पुष्कळ लोकांना हात कसे धुवावे हे माहितीच नाहीत. हात धुण्याच्या योग्य पध्दतीचे पाच टप्पे आहेत. सुरुवातीला पाण्याने हात ओले करावे व त्यानंतर हाताला साबण लावावी. हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. बोट एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. उजव्या हाताच्या बोटांची टोके डाव्या हाताच्या तळव्यावर गोल फिरवून घासावी आणि त्यानंतर तीच क्रिया दुस-या हाताने करा म्हणजे नखं स्वच्छ होतील व पाणी वापरुन हात खळवळून घ्यावेत.
बालकांना होणा-या आजारामागे जंतू, न दिसणारे किटक, धूळ ही प्रमुख कारणे आहेत. या सर्व घटकांना शरीरात जाण्याचं माध्यम म्हणजे हात. हाताला लागणारे, चिकटणारी धुळ, घाण, जंतू इतके सुक्ष्म असतात कि ते साध्या डोळयांना दिसत नाहीत. परिणामी कपडयाने पुसले किंवा पाण्याने धुतले तरी आपल्याला हात स्वच्छ दिसतात. दिवसभरात आपला हात अनेकदा चेह-यावर फिरत असतो. यात हाताने नाक-डोळे पुसणे, आळस देतांना, शिंकतांना हाताचा वापर होतो, त्यातून हे जंतू शरीरात जातात. कुमारवयीन किंवा प्रौढ व्यक्तींची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागत नाहीत. मात्र लहान मुलांना त्याचा मोठा फटका बसतो.
दिवसभर खेळतांना किंवा वावरताना लहान मुलांचे हात अनेकदा विविध वस्तू, कपडयांना लागतात. त्यात मुलं दोन ते पाच वर्षा दरम्यानची असतील तर ती सायकल खेळण्यासह, धावणे, विविध खेळ खेळतात. काही मुलं सारखी माती-चिखलात खेळण्याचा हट्ट धरतात. अशा मुलांना या जंतू, धुळीच्या संसर्गाची शक्यता जास्त असते. मुलं बाहेरुन खेळून आली की त्यांनी साबणाने हात-पाय-तोंड धुतले तर ठिक अन्यथा खोकणे, शिंकणे ही प्राथमिक लक्षणे तात्काळ दिसतात. त्यावर औषध उपचार करुन आजार न होण्याची काळजी घेतली जाते. मात्र या औषध उपचारापैकी प्रभावी उपाय म्हणजे साबणाने हात धुणे. या साध्या व स्वस्त उपाययोजनेने हातावाटे होणारे आजार पन्नास टक्के कमी होतात, हे संशोधनातून सिध्द झाले आहे.
मागच्या वर्षापासून आपण कोविड-19 चा सामना करत आहोत. यामध्ये स्वच्छतेला खूप महत्व दिले असून विशेषत: हाताची वारंवार स्वच्छता करण्यावर भर देण्यात येत आहे. कोविडच्या अनुषंगाने स्वच्छेचे महत्व नागरिकांना समजले असून हात धुण्याचे महत्वही त्यांना पटले आहे. केवळ साबणाने हात धुतल्यास विविध आजाराचा पन्नास टक्के धोका टळू शकतो हे सिध्द झाल्यानंतर युनिसेफ, संयुक्त राष्ट्रसंघ यांसह काही खासगी संस्थांनी पुढाकार घेत आहेत. साबणाने हात धुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले. 2008 मध्ये जागतिक पाणी सप्ताहानिमित्त आयोजित बैठकीत ग्लोबन हॅन्डवॉशिंग डे म्हणजेच जागतिक हात धुणे दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी 15 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली. खासकरुन लहान मुलांना साबणाने हात धुण्याची सवय लागावी, त्यांना साबणाने हात धुण्याचे महत्व लक्षात यावे म्हणून या दिवसावर विशेष भर दिला जातो आहे.
मिलिंद व्यवहारे, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा परिषद नांदेड, 8626025825