नांदेड| महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून ओळख निर्माण करावी. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या सोबतच वैचारीक प्रकल्भतेसाठी नियमीत वाचन करणे, आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगासह स्वतःसाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.
जिल्हा परिषद व इनरव्हिल क्लब नांदेडच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात विशाखा गाईड लाईन कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. रामेश्वर बोले, अॅड. दीपा बियाणी, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, डॉ. विद्या पाटील, मिनाक्षी पाटील, सुधा सुकाळे, कृष्णा मंगनाळे, स्नेहा पाथरीकर आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, महिला कर्मचारी कामात पारंगत असणे आवश्यक आहे. काम करतांना येणा-या अडचणी व तक्रारी असल्यास विशाखा समितीकडे निर्भिरपणे मांडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचा शॉल व बुके देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ताणतणाव विषयावर डॉ. रामेश्वर बोले यांनी तर विशाखा समिती विषयी अॅड दीपा बियाणी यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी इनरव्हिल क्लब तर्फे कोरोना काळात काम केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले तर सुत्रसंचालन किर्ती सुत्तरवार यांनी केले. सदर कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.