आज आषाढी पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा आहे. हा अतिशय महत्वपूर्ण असा दिवस मानला जातो. तो विविध पध्दतीने साजरा केला जातो. बौध्द संस्कृती मध्ये या दिनास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या संस्कृतीस अडीच हजार वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. तसेच बौध्द संस्कृती मध्ये वर्षातील येणाऱ्या सर्व पौर्णिमेस एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या या मंगल दिनापासून म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून 'वर्षावास प्रारंभ' असतो. तो आश्विन पौर्णिमेस पूर्ण होतो. हा महत्वाचा काळ मानल्या जातो. आणि याच दिनाची महत्त्वाची दुसरी घटना म्हणजेच आषाढी पौर्णिमेलाच बुद्धांनी पाच परिव्राजकास सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश करून गुरु शिष्यास प्रारंभ केला. तो ऐतिहासिक कालखंड म्हणजे इ.स.पू.528 हा होय.
बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या धम्ममार्गाची रूपरेषा निश्चित केली. ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे. पण सामान्य मानसाला हे तत्त्व मान्य होतील का? ते अनुकरण करतील का? बुध्दीमान लोकांना हे तत्वज्ञान सहजासहजी कळेल काय?असे विविध प्रश्न त्यांच्या मनात रेंगाळत होते. मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच तो आनंद आणि सुख मानतो. स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. त्यामुळे भ. बुद्धाचे मन विचलित होऊन धम्मोपदेश देण्याऐवजी ते निष्क्रीयतेकडे वळले. पण ब्रह्म सहंपति यांच्या ते लक्षात आले ते भ.बुद्धास म्हणाले, 'आता आपण सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. सम्यक सम्बुध्द प्राप्त केलेले भगवंत आहात.आपण तथागत आहात. या जगाला अंधकारातून बाहेर काढा. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी खुले करा. जन्मऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, उठा आणि जगाकडे जा. त्यांच्याकडे पाठ फिरवू नका.
भ. बुद्धांनी ब्रह्म सहंपतिची विनंती मान्य केली आणि जगाला धम्मोपदेश देण्याचा निश्चय केला
पण त्यांना प्रश्न पडला की हा धम्मोपदेश प्रथम कोणाला द्यायचा? लगेच त्यांना या क्षेत्रातील दिग्गज आधार कालाम यांचे स्मरण झाले. पण त्याचा मृत्यू झाला असे कळाले. तेंव्हा त्यांनी पुन्हा शोध घेतला. त्यांनी उद्दक यास धर्मोपदेश देण्याचा विचार केला. पण त्याचाही मृत्यू झाला होता. आता शेवटी त्यांना स्मरण झाले ते त्यांच्या सोबत असणाऱ्या पाच परिव्राजकाचे. जे की निरंजना नदीकाठी त्यांच्या सोबत होते. तेव्हा त्यांनी तपश्चर्या आणि कायाक्लेशाचा मार्ग त्यागला. तेंव्हा संतप्त होवून त्याचा त्याग केला होता. आणि म्हणून ते पाचही परिव्राजक बुध्दांपासून दूर झाले होते. पण त्यांनी भ.बुद्धासाठी खुप काही केले होते. त्यांची सेवा केली होती. म्हणून त्यांना उपदेशासाठी त्यांनी पात्र समजले. या पाच जनांची त्यांनी चौकशी केली असता ते वाराणसी जवळ सारनाथ येथे ऋषी पतनच्या मृगवनात ते आहेत, असे कळाले. त्यांच्या शोधात ते गया येथून पायी चालत निघाले. जेव्हा बुद्ध तेथे पोहोचले, तेव्हा त्या पाचही परिव्राजकांनी न बोलण्याचे आणि स्वागत न करण्याचे ठरविले.
पण बुद्ध जसेजसे त्यांच्या जवळ येत होते. तसे तसे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत होते. कारण बुद्धाच्या त्या बुध्दी तेजाकडे ते आकर्षित होत होते. आणि आपोआप बुद्धांच्या स्वागतासाठी ते कार्यरत होत होते. लगेच त्यांनी भ.बुद्धांचे आस्थेवाईकपणे स्वागत केले. त्यांना बसण्यास आसन दिले आणि अभिवादन केले. नंतर भगवान बुद्धांनी कौंण्डिण्य, अश्वजीत, वप्प, महानाम आणि भद्दीय या पाच परिव्राजकास धम्मोपदेश दिला. हा जगातील पहिला धम्मोपदेश मानला जातो.
भ.बुद्धांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यानंतर त्या पाचही जणांनी अनेक प्रश्न विचारले. भ. बुद्धाने समर्पक उत्तरे दिली त्यांचे समाधान केले. आणि मग आपला धम्ममार्ग त्यांना समजावून सांगितला.
हे परिव्राजकांनो, हा मार्ग धम्माचा आहे. या धम्म मार्गाचे ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. मृत्यूनंतरच्या जीवनाशी या धम्माला काही ही कर्तव्य नाही. या धम्माचे धर्मविधी आणि कर्मकांडाशी काहीही सोयरसुतक नाही. या धम्माचा केंद्र बिंदू मनुष्य आहे. या पृथ्वीवर जिवंतपणी माणसामानसातील संबंध हाच या धम्माचा केंद्र बिंदू आहे. ही तथागताच्या धम्माची प्रथम मान्यता होय. दुसरी मान्यता सांगताना बुध्द म्हणतात, मनुष्यमात्र दुःखी, कष्टी आणि दारिद्रय जीवन जगतात. हे जग दुःखाने व्यापलेले आहे. या जगातून दुःखाचा विनाश हाच या धम्माचा हेतू होय. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाशाचा मार्ग दाखविणे हिच धम्माची आधारशिला होय.
तो नष्ट करण्याचा मार्ग सांगताना बुद्ध म्हणतात,प्रत्येकांनी त्यांच्या धम्मानुसार आचरण केले पाहिजे त्याने दुःखाचा निश्चितच नाश होईल.धम्मानुसार आचरण म्हणजे १)पवित्रतेच्या मार्गाचे आचरण, २)धम्माच्या मार्गाचे आचरण,३)शीलाच्या मार्गाचे आचरण हे होय.
भ.बुद्धांनी मध्यम मार्गाचा अवलंब केला
परिव्राजकाने भ.बुद्धांना धम्माची व्याख्या विचारली. तेव्हा भ.बुद्ध पावन पथाच्या मान्यतेनुसार जीवनाचे तत्वे विवेचन करतांना सांगतात. १)कोणालाही आहात न करणे, हिंसा न करणे, २) चोरी न करणे, दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला हक्क न सांगणे, ३) असत्य कथन न करणे,४) व्यभिचार न करणे, ५) मादक द्रव्यांचे सेवन न करणे. या तत्त्वांना मान्यता देणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. जीवनात आपण केलेली कर्म तपासून पाहण्यासाठी काही मापदंड असणे आवश्यक आहे. म्हणून ही पाच शील मानसाने अंगीकारले पाहिजे. नक्कीच ते यशाच्या सागराचा आनंद घेतील आणि दुःखापासून दूर राहतील.
भ.बुद्धांनी त्यांना अष्टांगिक मार्ग सांगितला
सम्यक दृष्टी - सम्यक दृष्टी म्हणजे योग्य ज्ञान. चार आर्य सत्य (दुःखाचे अस्तित्व, दुःखाचे मुळ,दुःखाचा नाश आणि दुःख नाशाचा मार्ग) जाणून घेणे.
सम्यक संकल्प -अर्थ मन हेच सर्व संकल्पाचे आश्रय स्थान आहे. नैष्कर्म,अव्यापाद,अविहिंसाहि सम्यक संकल्प आहेत.
सम्यक वाणी - सत्य कथन करणे, असत्य कथन न करणे, अभद्र कथन न करणे, दुसऱ्याची निंदा न करणे, दुसऱ्या प्रती अपशब्द कटु वचन ,कथन न करणे हे होय.
सम्यक कर्मांत - योग्य आचरणाची शिक्षा मिळते, आपली प्रत्येक कर्म दुसऱ्यांच्या भावना आणि अधिकारांचा आदर करणे हे होय..
सम्यक आजीविका- निषीद्ध व्यवसाय वा उद्योग धंदा सोडून विहीत उद्योग धंदा करावा व आपली उपजीविका चालवावी ही सम्यक आजीव आहे. तर इतरांना दुःखात टाकणारे व्यवसाय किंवा उद्योग टाळणे म्हणजेच योग्य उपजीविका होय.
सम्यक व्यायाम - कठोर परिश्रम, किंवा प्रयत्न हे होय. कुशल कर्मच तेवढे उत्पन्न व्हावे यासाठी प्रयत्न करणे होय.
सम्यक स्मृती - म्हणजे जागरूकता होय. कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धर्मानुपश्यना ही सम्यक स्मृती होय.
सम्यक समाधी - ही शेवटची पायरी आहे. तिचे साध्य कुशल-शुभ मनोवृत्ती वाढवून, चित्ताची एकाग्रता, स्थिरता साधने होय. एवढेच नाही तर दहा पारमिता किंवा सदगुण सांगून आणि त्यांचे जीवनातील स्थान समजावून सांगितले. १)शील,२) दान,३)उपेक्षा,४)नैष्कर्म, ५)वीर्य, ६)शांती,७)सत्य,८)अधिष्ठान, ९)करुणा आणि१०) मैत्री हे होय. त्या पाच परिव्राजकांना हा सत्यार्थाने नवीन धम्म आहे याची जाणीव झाली. त्यांना समस्या विषयीच्या नवीन दृष्टिकोनाने एवढे प्रभावीत केले की, ते एक मुखाने वदले की, जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्म संस्थापकाने धम्माचा खरा आधार मानवी दुःख आहे ही शिकवण दिली नाही.
जगात इतिहासात कोणत्याही धर्म संस्थापकाने दुःखाचे निराकरण हा धर्माचा उद्देश आहे ही शिकवण दिली नाही. जगाच्या इतिहासात मानव मुक्तीचा असा मार्ग कोणीही शिकविला नाही. हा मार्ग साधा आणि सोपा आहे. अप्राकृतिक आणि अपौरुषेय शक्तीच्या हस्तक्षेपा पासून मुक्त आहे.. हा मार्ग स्वतंत्र आहे. हा मार्ग आत्म्याप्रती श्रद्धा, ईश्वराप्रती आणि मृत्यू नंतरच्या जीवनाप्रती श्रद्धा, यांचा विरोध आहे. जगाच्या इतिहासात कोणीही असा धर्म प्रतिपादीला नाही. या धम्माचा ईश्वरीय वचनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हा धम्म ईश्वरी आदेशाचा परिणाम नाही. धम्मदेशना ही मानसांच्या सामाजिक गरजांतून उत्पन्न झाली आहे. त्यांचा आधार म्हणजे माणसांच्या सामाजिक गरजा आहेत. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्माने मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे शांती अशी संकल्पना मांडली नाही. असे सुख जे मनुष्याला याच जगात याच जीवनात धम्मानुसार जीवन जगून प्राप्त होऊ शकते.
भ.बुद्धाने नवीन धम्माचा उपदेश दिल्यानंतर तो श्रवण करून परिव्राजकांनी कथनास प्रतिसाद दिला
त्यांना बुद्धांमध्ये जीवन सुधारक आढळला. जो नैतिक ध्येयाने प्रेरित आहे. जो तत्कालिन बौद्धिक ज्ञानाशी सुपरिचित आहे. त्यांच्यात मौलीकता आहे. त्यांच्यात धैर्य आहे. तो विरोधी विचारही दृढतेने मांडू शकतो. मुक्तीचा मार्ग प्रतिपादित केला आहे. आणि ही मुक्ती याच जीवनात आत्मसाधना आणि आत्मसंयमाने चित्त परिवर्तन करून प्राप्त होऊ शकते. या भव्य ज्ञानाने ते प्रभावित झाले. ते बुद्धमय झाले. बुध्दाप्रती त्यांच्या चित्तात असीम श्रद्धा उपजली. आणि त्यांच्या प्रती त्यांनी अविलंब आत्मसमर्पण केले. त्या पाचही परिव्राजकांनी बुद्धांना विनंतीपूर्वक प्रार्थना केली की शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार व्हावा.
भ.बुद्धांनी त्यांना "एही भिख्खवे" म्हणून भिख्खू स्वीकार करून संघात दीक्षित केले. ते पंचवर्गीय भिख्खू म्हणून प्रसिद्ध पावले आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास देशोदेशी निघून गेले. म्हणून तथागत बुद्धांविषयी गौरवाने म्हणावंस वाटते..
*विश्वगुरु तू जगाचा*
*तथागता तू शोभला,*
*मध्यम मार्ग स्वीकारुनी*
*मार्ग दुःख मुक्तीचा दिला.*
- बाबुराव पाईकराव, डोंगरकडा 9665711514.
